पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने शहर शिवसेनेत (शिंदे) फेरबदल करण्यात आले आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुणे महानगरप्रमुखपदी नियुक्ती करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील पक्षाची सूत्रे धंगेकर यांच्या हाती सोपविली आहेत. लवकरच दोन किंवा तीन शहरप्रमुख नेमले जाणार असून, धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख काम करणार आहेत.
शहरातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघांचे सर्वाधिकार धंगेकर यांना देण्यात आले आहेत. शहरप्रमुख हे धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काम पाहणार आहेत. त्यामुळे शहराची सर्व सूत्रे धंगेकर यांच्या हाती गेली असून, शिवसेनेचा कारभार ‘कसब्या’तून चालणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
धंगेकर यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला होता. शिवसेनेत दाखल झाल्याने धंगेकर यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपविली जाणार, याबाबत सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत होती. मात्र, पदासाठी नव्हे, तर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्ष प्रवेश केल्याचे धंगेकर यांनी जाहीर केले होते.
गेल्या महिन्यात शिवसेनेचे प्रदेश सचिव यांनी या संदर्भात पुणे दौरा केला होता. शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्यासमवेत त्यांनी या संदर्भात चर्चा केली होती. धंगेकर हे माजी आमदार असल्याने त्यांना कोणते पद देता येईल, याची चाचपणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांची थेट पुणे महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनात्मक बांधणी, प्रचार, महापालिका निवडणुकीची तयारी आणि विधानसभा मतदारसंघात स्थानिक नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी धंगेकर यांच्याकडे असणार आहे.
येत्या चार महिन्यांत महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील शिवसेनेचे संघटनबांधणीचे आव्हान धंगेकर यांच्यापुढे असणार आहे.
सर्व आठही मतदारसंघांची जबाबदारी माझ्याकडे असून, शिवसेना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याबद्दल पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार. या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न केला जाईल. – रवींद्र धंगेकर, पुणे महानगरप्रमुख, शिवसेना