बारामती: सहकारातील अग्रेसर असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून, २१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २२ जूनला मतदान, तर २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. इंदापूरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचीही निवडणूक जाहीर झाली असल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

या कारखान्याची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे स्थगिती होती. याचिका फेटाळण्यात आल्यानंतर निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी संचालक मंडळाचे पॅनेल, तसेच चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता असणार आहे.

या कारखान्याच्या २१ जागांसाठी २१ ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. २८ मे रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी २९ मे ते १२ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १३ जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२२ जून रोजी मतदान आणि २४ जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले.या निवडणुकीसाठी हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.