पुण्याच्या महापौर पदासाठीची निवडणूक २ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली असून सत्ताधारी राष्ट्रवादीकडून महापौरपदाची संधी कोणाला मिळणार याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे महापौर वैशाली बनकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा १२ ऑगस्ट रोजी दिला असून नवीन महापौरांची निवड होईपर्यंत त्या कारभार पाहणार आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार महापौरांचा राजीनामा महापालिकेच्या खास सभेपुढे १९ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आला होता. त्यानंतर ही माहिती विभागीय आयुक्तांना कळवण्यात आली. पुढील प्रक्रियेत आता प्रत्यक्ष निवडणूक होत असून त्यासाठी २ सप्टेंबर हा दिनांक निश्चित करण्यात आला आहे.
महापौरांच्या राजीनाम्याच्या अवलोकनार्थ आलेला विषय खास सभेत पुकारला जाताच काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला होता. त्यामुळे महापौर निवडणुकीत काही वेगळे राजकारण व समीकरणे होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
प्रभाग क्रमांक ४० मधील पोटनिवडणूक, तसेच नव्याने सात गावांचा समावेश यासह काही मुद्यांवर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस महापौर पदाच्या निवडणुकीत नक्की कोणती भूमिका घेणार यावर सर्व चित्र अवलंबून राहील, असे सांगितले जात आहे. या वादाच्या पाठोपाठ पुण्यात काँग्रेसला सदैव गृहीत धरूनच राष्ट्रवादीचा कारभार सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही केल्यामुळे काँग्रेसचा निर्णय प्रदेश पदाधिकाऱ्यांकडूनच होणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेविकांनीही तयारी सुरू केली असून चंचला कोद्रे, नंदा लोणकर, उषा कळमकर, संगीता कुदळे आणि अश्विनी कदम यांची नावे या पदाच्या चर्चेत आहेत.