मावळ लोकसभेच्या रिंगणातील लक्षवेधी उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी मोठय़ा संख्येने समर्थकांची रॅली काढून उमेदवारीअर्ज दाखल केला. शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनी समर्थकांसह लावलेली हजेरी, शेकाप नेते जयंत पाटील यांचे समर्थक व मनसे कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या रॅलीत राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या हजेरीने सर्वाच्याच भुवया उंचावल्या.
राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून शेकाप व मनसेच्या पाठिंब्यावर रिंगणात उतरलेल्या जगतापांनी पिंपरी पालिकेत अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्याकडे मावळ लोकसभेसाठी उमेदवारीअर्ज दाखल केला. या वेळी शेकापचे जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, माजी महापौर तात्या कदम, हनुमंत गावडे, मनसेचे बाबाराजे जाधवराव, उमेश चांदगुडे, मनोज साळुंके, अनंत कोऱ्हाळे, स्वाभिमानी रिपाइंचे रमेश साळवे उपस्थित होते. जगतापांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेले खासदार बाबर आपल्या समर्थकांसह या वेळी हजर होते. राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार रिंगणात असतानाही बहुतांश नगरसेवक व पदाधिकारी जगतापांच्या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत एकत्र आलेली राष्ट्रवादीची मंडळी जगताप उमेदवारीअर्ज भरत असताना इतरत्र फिरत होते आणि आपला काहीच संबंध नसल्याचेही दाखवत होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, बाबरांनी पाठिंबा दिला, ही जमेची बाजू आहे. माजी मुख्यमंत्री अंतुले यांनीही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारण्याचा निर्णय योग्य होता, त्याचा जगतापांना पश्चाताप होणार नाही. एकतर्फी लढाईत ते निवडून येतील. जगताप म्हणाले,जिंकण्यासाठीच लढतो आहे, विजय निश्चित आहे. पुढील सर्व निर्णय राज ठाकरे व जयंत पाटील घेतील, असे ते म्हणाले.