लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला आता अवघे सहा दिवस राहिल्यामुळे सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते या सहा दिवसात पुण्यात येत आहेत. राजकीय रणधुमाळीसाठी पुण्यात नरेंद्र मोदी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आदी नेते येत असून प्रचाराच्या सांगता सभेसाठी राहुल गांधी १५ एप्रिल रोजी पुण्यात येतील.
निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता जाहीर सभांना जोर आला आहे. सर्वच पक्षांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना पुण्यात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालवले होते. त्यानुसार या नेत्यांचे दौरे आता पुण्यात सुरू होत आहेत. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे गुरुवारी (१० एप्रिल) शहरात येत असून त्यांच्या दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शुक्रवारी (११ एप्रिल) पुणे दौऱ्यावर आहेत. आर. सी. एम. गुजराथी हायस्कूल, जुना बोपोडी नाका आणि स्वयंवर मंगल कार्यालय येथे त्यांच्या जाहीर सभा अनुक्रमे सायंकाळी साडेसहा, साडेसात आणि रात्री साडेआठ वाजता होतील. स्वयंवर मंगल कार्यालयात व्यापारी मेळावा होणार आहे.
भाजपतर्फे नरेंद्र मोदी यांची सभा शनिवारी (१२ एप्रिल) आयोजित करण्यात आली असून सभेचे ठिकाण आणि वेळ अद्याप जाहीर व्हायचे आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही १४ एप्रिल रोजी पुण्यात येत आहेत. पवार यांच्या तीन आणि ठाकरे यांच्या दोन सभा त्या दिवशी होणार आहेत. पवार यांच्या सभा कसबा, पर्वती (शिंदे हायस्कूल) आणि कोथरूड (मोरे विद्यालय) या युतीचे प्राबल्य असलेल्या मतदासंघात होणार आहेत, तर राज यांच्याही सभा पर्वती (मुक्तांगण स्कूल) आणि कोथरूड (जीत मैदान) मतदारसंघात होणार आहेत.
समारोप सभेसाठी राहुल
विश्वजित कदम यांच्या प्रचारसांगता सभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुण्यात येणार आहेत. राहुल यांची सभा १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.