पुणे : कोंढव्यातील एका सोसायटीतील निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी महिलेला घेराव घालून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी खान नावाच्या व्यक्तीसह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक अधिकारी गौरी लोखंडे (वय ४२) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या शिवशंकर गिरीजा सहकारी गृहरचना संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने लोखंडे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. लोखंडे आणि त्यांचे सहकारी सोसायटीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी सोसायटीच्या आवाराचे मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या वेळी खान नावाच्या रहिवाशाने रखवालदाराकडे विचारणा केली. सोसायटीच्या आवारात प्रवेश देताना, नावनोंदणी केली का ? अशी विचारणा खानने रखवालदाराकडे केली. त्यानंतर खानने लोखंडे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. तुम्ही सोसायटीत आला कसे, असे सांगून खानने लोखंडे यांच्याकडील मोबाइल संच हिसकावला. लोखंडेंने मोबाइलमध्ये केलेले चित्रीकरण त्याने नष्ट केले. त्यानंतर त्याने आठ ते दहा जणांना सोसायटीच्या आवारात बोलावून घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी लोखंडे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या दोघांना घेराव घातला. असभ्य भाषेत बोलून लोखंडे आणि सहकाऱ्यांना सोसायटीच्या बाहेर जाण्यास मज्जाव केला. सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करत आहेत.