पुणे विभागात ३२४ कोटींची, कृषी ग्राहकांकडे २०२ कोटींची थकबाकी
महावितरण कंपनीकडून वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा होत नसल्याने थकबाकीचा मनोरा वाढत चालला आहे. पुणे परिमंडलमध्ये ३२४ कोटींची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी कृषिपंपधारकांकडे असून, ती तब्बल २०२ कोटी रुपये आहे. शहरी विभागात १२२ कोटी रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे आव्हान महावितरणपुढे असून, त्यासाठी घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांमधील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कृषी ग्राहकांनाही थकबाकीचा भरणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.
अनेक ग्राहकांकडून वेळेत वीजबिलांचा भरणा करण्यात येत नसल्याने थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुणे परिमंडलच्या मुख्य अभियंतापदाची धुरा एम. जी. शिंदे यांच्या हाती आली आहे. पूर्वीचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनीही थकबाकीदारांविरुद्ध जोरदार मोहीम राबवली होती. मुंडे यांच्या काळात विशेषत: बडय़ा वीजचोरांवर धडक कारवाई करण्यात आली होती. सध्या बिलांची थकबाकी वाढल्याने शिंदे यांनी वसुलीच्या मोहिमेवर लक्ष्य केंद्रित केले आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे, िपपरी, लोणावळा, चाकण, तळेगाव आदी शहरांसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, पुनजरेडणीचे शुल्क भरून वीजपुरवठा सुरू करून घ्यावा लागतो. महावितरणच्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत.
चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह ६६६.ेंँं्िर२ूे.्रल्ल ही वेबसाईट तसेच मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कुणाकडे किती थकबाकी?
पुणे परिमंडलात सद्य:स्थितीत घरगुती, वाणिज्यिक तसेच औद्योगिक वर्गवारीतील ५ लाख ९० हजार ४२१ वीजग्राहकांकडे १२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात ५ लाख १ हजार २०० घरगुती ग्राहकांकडे ७३ कोटी ८८ लाख रुपये, ७६ हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे ३४ कोटी ८५ लाख, तर सुमारे ११ हजार औद्योगिक ग्राहकांकडे १३ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी आहे. पुणे परिमंडलातील ९१ हजार ११ कृषिपंपधारकांकडे २०१ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर वर्गवारीतील ७८४७ वीजग्राहकांकडे ८० कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे.