प्राची आमले

वातावरण दूषित करणारे अशी समाज माध्यमांविषयी प्रतिक्रिया समाजामध्ये निर्माण होत असताना अनेक गटांनी समाज माध्यमांचा वापर करून समाजासमोर अनेक आदर्श निर्माण केले आहेत. समाज माध्यमाद्वारे दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध क रून देणाचे काम क्रिएटिव्ह पीपल या गटाने केले आहे.

दिव्यांग व्यक्ती म्हटल्यावर मदतीसाठी कायम इतरांवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती असेच चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.  चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्येही सर्रास असेच चित्रण दाखविले जाते. वास्तविक दिव्यांग व्यक्ती ही इतर व्यक्तींपेक्षा कमी नसते. समाजामध्ये त्यांना आपली स्वत:ची ओळख निर्माण करता यावी या उद्देशातून महेश ठाकरे आणि श्रीजा ठाकरे या दांपत्याने ‘क्रिएटिव्ह पीपल’ या संस्थेची स्थापना केली. दिव्यांग मुलांमध्ये कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी संस्थेने उपलब्ध करून देण्याबरोबरच आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनविण्याचे काम केले आहे.

‘क्रिएटिव्ह पीपल’या संस्थेची स्थापना नोव्हेंबर २०१५ मध्ये वारजे येथे झाली. सुरुवातीला संस्थेतर्फे दिव्यांग व्यक्तींना फक्त प्रशिक्षण देण्यात येत असे. संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचत गेली तशी विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. या वाटचालीची माहिती देताना श्रीजा ठाकूर म्हणाल्या, दिव्यांग व्यक्तींचे समाजात वेगळे स्थान निर्माण व्हावे या उद्देशाने संस्था गेली तीन वर्षे काम करीत आहे. १८ वर्षांपुढील दिव्यांग मुला-मुलींना प्रशिक्षण दिले जात असे. मुलींना रंगकामाचे आणि मुलांना लाकूड कापण्याच्या (वूड कटिंग) तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात संस्थेमार्फत फक्त प्रदर्शने भरविण्यात आली. या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनानंतर या मुलांना रोजगार मिळावा या उद्देशाने पुढील काम सुरू झाले.

दिव्यांग मुलांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून गणेशोत्सवात मखर बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या मुलांनी बनविलेल्या मखरांना चांगली मागणी मिळाली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर हैद्राबाद, बंगळुरू तसेच अमेरिकेतूनही ऑर्डर आली होती. या सर्व प्रक्रियेमध्ये समाज माध्यमांचा मोठा सहभाग आहे. मखरांची कोणतीही  जाहिरात न करता फक्त समाज माध्यमांमुळे लोकांपर्यंत याची माहिती देण्यात आली. ते पाहून मखरांना मागणी वाढली. प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीच्या पाश्र्वभूमीवर दिव्यांग मुलांना पर्यावरणपूरक मखर तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे मखर वजनाने अतिशय हलके असून किमान तीन वर्षे सहजपणे  वापरता येतील अशा स्वरूपाचे आहे. गणेशभक्तांना त्यांच्या आवडीची रंगसंगती व आकाराप्रमाणे मखर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फक्त मुलेच नाही तर मुलींसाठीदेखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. विवाह झाल्यामुळे संस्थेमध्ये दररोज येऊ शकत नाहीत पण, काम करण्याची इच्छा आहे अशा मुलींचाही विचार करण्यात आला आहे.  त्यांना केक व चॉकलेट बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आता या मुली ऑर्डर येईल त्यानुसार घरबसल्या केक आणि चॉकलेट बनवून देत आहेत. त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

भावी काळातील संस्थेच्या उपक्रमाविषयी ठाकरे म्हणाल्या, या वर्षी मुलांना पदपथासाठी प्लास्टिकपासून ब्लॉक्स, विटा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय आजपर्यंत मुलांनी टायरचा वापर करत कॅफेसाठी आकर्षक  टेबल, टेडी बेअर, जिराफ अशा वस्तू  बनवून दिल्या आहेत.  मुलांना नवनवीन गोष्टी  शिकवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संस्थेच्या अधिक माहितीसाठी व पर्यावरणपूरक मखरांसाठी ९६०४५३१३३९ किंवा  ८६०००८०८६० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ‘क्रिएटिव्ह पीपल ’या नावाने संस्थेचे फेसबुक पेज आहे.