पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी घोषणेला प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी- चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मोरवाडी येथील भाजपच्या शहर कार्यालयात ही कार्यशाळा पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अभियानाचे प्रदेश सहसंयोजक, आमदार विक्रम पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आगामी ९० दिवस चालणाऱ्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करणे हा होता. यामध्ये पक्षाचे धोरण, अभियानाची उद्दिष्ट्ये आणि स्थानिक पातळीवर राबवायचे उपक्रम यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर नितीन काळजे, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, सरचिटणीस विकास डोळस, वैशाली खाडये, मधुकर बच्चे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, अभियान संयोजक राजु दुर्गे, सर्व १४ मंडल अध्यक्ष आणि प्रत्येक मंडळातील अभियान कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदेश सहसंयोजक आमदार विक्रम पाचपुते यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा मूळ गाभा स्पष्ट केला. ते म्हणाले की, “हे केवळ एक सरकारी अभियान नसून, देशातील प्रत्येक नागरिक स्वतःच्या पायावर उभा राहून देशाला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठी घेतलेली एक सामूहिक प्रतिज्ञा आहे. या अभियानांतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणे महत्त्वाचे आहे.” त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरासारख्या औद्योगिक नगरीसाठी या अभियानाचे महत्त्व विशद केले.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, “ही कार्यशाळा आपल्या सर्वांसाठी एक दिशादर्शक आहे. आपल्याला प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक गल्लीत जाऊन ‘आत्मनिर्भर भारता’ची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. स्थानिक कलाकारांना, लघु उद्योजकांना आणि महिला बचत गटांना या अभियानात कसे सहभागी करून घेता येईल, यावर आपण विशेष भर दिला पाहिजे.”
अभियान शहर संयोजक राजू दुर्गे यांनी आगामी ९० दिवसांच्या कार्यक्रमाची विस्तृत रूपरेषा सादर केली. यामध्ये शहरात ठिकठिकाणी जनजागृती शिबिरे, कार्यशाळा, तसेच ‘व्होकल फॉर लोकल’यावर आधारित विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्याची योजना त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघाच्या संयोजकांनी आपापल्या भागातील कार्याचे नियोजन सादर केले. राम वाडकर यांनी त्यांच्या मतदारसंघात लहान उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याची कल्पना मांडली. राजेंद्र बाबर यांनी युवावर्गाला कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन देण्यावर भर दिला.