म्हाडाच्या जागेवर अतिक्रमण; खराडीतील जागेवरील अतिक्रमणे दिवाळीनंतर हटविणार

म्हाडाकडून ४२५३ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माने पाटील यांनी ही माहिती दिली.

खराडीतील जागेवरील अतिक्रमणे दिवाळीनंतर हटविणार

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) खराडी येथील जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे. दिवाळीनंतर पोलीस बंदोबस्तात म्हाडाच्या जागेवरील अतिक्रमण हटवले जाईल, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.

 म्हाडाकडून ४२५३ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माने पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पुण्यात म्हाडाची ६२२ एकर जागा असून त्यापैकी ४९८ एकर जागेत म्हाडाच्या वसाहती, इतर इमारती आहेत. खराडी मासळी बाजार परिसरातील जागेत अतिक्रमण झाले आहे. ही जागा टपाल खात्याला देण्यात आली आहे. मात्र, काही कारणांनी ही जागा ताब्यात घेण्यात आली नाही. परिणामी या जागेत अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र, शहरात करोना संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने सध्या बंदोबस्त पुरवता येणार नाही, असे पोलीस प्रशासनाकडून कळवण्यात आले. आता शहरात करोना संसर्ग आटोक्यात आल्याने दिवाळीनंतर पोलीस बंदोबस्तात म्हाडाच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्यात येतील.

    दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ४२५३ घरांची सोडत काढण्यात येत आहे. चालू वर्षात जानेवारी, जूननंतरची ही तिसरी सोडत आहे. त्यामध्ये म्हाडाच्या योजनेतील २९४५, तर २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध होणाऱ्या १३०८ सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांची संगणकीय सोडतीचा प्रारंभ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित

पवार यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता पिंपरी वाघिरे येथे शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) करण्यात येणार आहे, असेही माने पाटील यांनी सांगितले.

सोडतीचे वेळापत्रक

सोडतीसाठी २९ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजल्यापासून २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरांसाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. सोडतीसाठी ऑनलाइन शुल्क १ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहे. प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १० डिसेंबर, तर अंतिम यादी १५ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम यादी घरे लागलेल्या लाभार्थ्यांसाठी १५ दिवसांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

सोडतीमधील घरांचा आढावा

म्हाडा गृहनिर्माण योजना – ५९ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुण्यात ७१९ सदनिका, पिंपरी-चिंचवड मध्ये ५८९ सदनिका अशा एकूण १३०८, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य) २८८६ अशा एकूण ४२५३ सदनिका या सोडतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Encroachment mhada site encroachment kharadi removed after diwali akp

ताज्या बातम्या