विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील अकरापैकी सहा जागांवर पराभूत झाल्यामुळे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील शिवसेनेच्या अस्तित्वावर गदा आल्याचे स्पष्ट झाले आहे. सक्षम उमेदवारांचा अभाव, वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष, कमकुवत झालेली संघटनात्मक बांधणी यामुळे शहरातही शिवसेनेचे म्हणावे असे अस्तित्व राहिलेले नाही. त्यातच पिंपरी, खेड, पुरंदर आणि जुन्नर येथील विद्यमान आमदारांना पराभवाचा धक्का बसल्यामुळे ग्रामीण भागातही शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर पिंपरी या शहरी भागातील केवळ एक जागा तर ग्रामीण भागातील पाच जागा शिवसेनेला लढण्यासाठी मिळाल्या. पिंपरी विधानसभा मतदार संघातून आमदार गौतम चाबूकस्वार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर पुरंदर येथून राज्यमंत्री विजय शिवतारे, जुन्नरमधून शरद सोनावणे, खेड येथून सुरेश गोरे या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती. याशिवाय आंबेगाव येथून राजाराम बाणखेले आणि भोर विधानसभा मतदार संघातून कुलदीप कोंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पिंपरीतील एक आणि उर्वरित जिल्ह्य़ातील पाच जागा लढण्यासाठी मिळूनही शिवसेनेला एकही जागा राखता आलेली नाही.
शहरातील जागा वाटपात शिवसेनेला डावलण्यात आल्यामुळे शिवसैनिकांकडून बंडखोरी करण्यात आली. त्यानंतर कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघ वगळता अन्य मतदार संघातील बंडखोरांनी तलवारी मान्य केल्या. विधानसभा निवडणुकीसाठी युती करताना ज्या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार ती जागा त्या पक्षाला असे सूत्र ठरले होते.
या सूत्रानुसार शहरातील एकही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला आली नाही. वडगांव शेरी, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर या पैकी एक जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी होत होती. मात्र ती धुडकाविण्यात आली. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत बसला. इंदापूरच्या जागेचीही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. शहर, जिल्ह्य़ातून शिवसेनेचा एकही आमदार विधानसभेत नाही, असे चित्र दिसत आहे.
पुण्यासह जिल्ह्य़ातून शिवसेनेचे एकही आमदार नसला, तरी शिवसेनेच्या अस्तित्वावर त्याचा कोणताही परिमाण होणार नाही. भक्कम संघटनेच्या जोरावर शिवसेना पुन्हा मुसंडी मारेल. विधानसभेतील प्रतिनिधित्वाचा विचार केला, तर शिवसेना राज्यातील सत्तेतच असणार आहे. त्यामुळे पुण्यासह जिल्ह्य़ातील प्रश्न मार्गी लावले जातील, हा विश्वास आहे.
– बाळा कदम, पुणे संपर्क प्रमुख