कात्रज ते स्वारगेट ते हडपसर या मार्गावर सुरू असलेला बीआरटीचा प्रयोग महापालिकेला तब्बल १२७ कोटी रुपयांना पडल्याची कबुली महापालिका प्रशासनानेच दिली आहे. विशेष म्हणजे, या प्रयोगावर एकीकडे आणखी कोटय़वधी रुपये खर्च होणार असून दुसरीकडे धनकवडीतील उड्डाणपुलासाठी बीआरटी मार्ग उखडण्याचेही काम करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या नेहरू योजनेमधून पुण्यात बीआरटीची योजना सन २००६ पासून सुरू असून अद्यापही ही योजना प्रायोगिक तत्त्वावरच सुरू आहे. केंद्र व राज्याने दिलेल्या अनुदानातून १२७ कोटी ४८ लाख रुपये एवढा खर्च बीआरटीच्या कात्रज ते हडपसर या मार्गावर झाला असला, तरी हा प्रयोग अद्यापही यशस्वी झालेला नाही. नगरसेविका कविता शिवरकर आणि विजया वाडकर यांनी चालू महिन्याच्या मुख्य सभेसाठी बीआरटीबाबत लेखी प्रश्न दिले असून त्यांच्या उत्तरातून ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.
बीआरटी योजनेत पीएमपी गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्ग बांधणे, सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग बांधणे तसेच पदपथ तयार करणे, बीआरटी प्रवाशांसाठी तसेच अन्य पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधणे, बस थांबे बांधणे तसेच त्यात सुधारणा करणे, दुभाजक बांधणे, विविध फलक लावणे, पावसाळी गटारे बांधणे, रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंती बांधणे, वाहतूक नियंत्रक दिवे तसेच वाहतूक नियंत्रक प्रणाली विकसित करणे आदी कामे बीआरटी योजनेत करण्यात आल्याचा दावा या उत्तरांमध्ये प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्षात या मार्गावरील सायकल मार्ग तसेच पदपथ आणि भुयारी मार्ग या कामांबाबत अनेक तक्रारी असून ही कामे योग्यप्रकारे केली नसल्यामुळेच या मार्गात त्रुटी राहिल्याच्या तक्रारी आहेत. नगरसेवकांनीही वेळोवेळी त्याबाबत आवाज उठवला आहे.
बीआरटीचा हा प्रयोग सुरू असतानाच बीआरटी मार्ग तोडून तेथे उड्डाणपुलाचेही काम सातारा रस्त्यावर हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे कोटय़वधींचा खर्च वाया गेला असून शहरातील आणखी तीन मार्गावर बीआरटीचे काम सुरू करण्यात आले आहे. नगर रस्त्यावर पर्णकुटी ते खराडी-महापालिका हद्द (७.९० किलोमीटर), पर्णकुटी ते डेक्कन कॉलेज ते बॉम्बे सॅपर्स चौक ते विश्रांतवाडी ते महापालिका हद्द (लांबी ४.७० किलोमीटर) आणि पाटील इस्टेट ते नगर रस्ता (लांबी ३.४० किलोमीटर) असे १६ किलोमीटर लांबीचे काम सुरू करण्यात आल्याची माहितीही लेखी उत्तरात देण्यात आली आहे. या कामांवर २६ कोटी ४० लाखांचा खर्च होणार असून त्यातील १८.३७ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
कात्रज ते हडपसर या मार्गावर सुरू असलेली बीआरटी योजना पुणेकरांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली योजना नाही, तर ती फक्त केंद्र व राज्याकडून मिळणारे अनुदान संपवण्यासाठीची व्यवस्था असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश चिटणीस, नगरसेवक संजय बालगुडे यांनी यापूर्वीच केला आहे. तसेच त्यासंबंधीच्या तक्रारींचे निवेदनही त्यांनी प्रशासनाला दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2013 रोजी प्रकाशित
बीआरटीचा प्रयोग पडला महापालिकेला सव्वाशे कोटींना
कात्रज ते स्वारगेट ते हडपसर या मार्गावर सुरू असलेला बीआरटीचा प्रयोग महापालिकेला तब्बल १२७ कोटी रुपयांना पडल्याची कबुली महापालिका प्रशासनानेच दिली आहे.
First published on: 21-11-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experimental basis brts cost only 127cr