पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगर आणि बाहेरगावाहून पुण्यात गणेश मंडळांची सजावट पाहण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री दहानंतरच्या सर्व गाड्या यात्रा विशेष गाड्या म्हणून मार्गावर धावणार असून रात्री दहा वाजल्यानंतर प्रचलित दरामध्ये पाच रुपयांची जादा आकारणी केली जाणार आहे.

एक आणि दोन सप्टेंबर, ८ सप्टेंबर या दिवशी १६८ जादा गाड्या संचलनात आणण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे तीन सप्टेंबर ते सात सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात ६५४ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.
स्वारगेट, नटराज हाॅटेल परिसर, स्वारगेट डेपो, महात्मा गांधी बसस्थानक, हडपसर-गाडीतळ, मोलेदिना हाॅल, ससून बसस्थानक, डेंगळे पूल, महापालिका भवन, काँग्रेस भवन, डेक्कन जिमखाना, कात्रज बसस्थानक, अप्पर डेपो, धनकवडी बसस्थानक, निगडी बसस्थानक, भोसरी बसस्थानक, चिंचवडगांव, पिंपळे गुरव, सांगवी, आकुर्डी रेल्वे स्थानक, रावेत, चिखली, संभाजीनगर येथून शहराच्या विविध भागात जादा गाड्या सोडण्यात येतील.

हेही वाचा : पुणे : करोनाचे विघ्न टळल्याने दोन वर्षांनंतर पुण्यनगरी गणेशमय

पीएमपीचे दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीत रात्री दहा नंतर बंद राहणार आहे. रात्री दहानंतर सर्व गाड्या यात्रा विशेष म्हणून संचलनात राहतील. त्यामुळे रात्री दहा नंतरच्या बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये पाच रुपये जादा आकारणी करण्यात येणार आहे. रात्रीची बससेवा विशेष बससेवा असल्याने सर्व प्रकारच्या पासधारकांना रात्री बारा वाजेपर्यंतच पासचा वापर करता येईल.

हेही वाचा : Ganesh Utsav 2022 : मध्यभागात कडक बंदोबस्त ; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शहर पोलिसांकडून शहरातील रस्ते सायंकाळी बंद करण्यात आल्यास बससेवा पर्यायी मार्गाने चालू ठेवण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने दिवसभराच्या संचलनामध्ये शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावरून संचलनात असलेल्या गाड्यांच्या मार्गात आवश्यकेतनुसार बदल करण्यात आले आहे.