पिंपरी- चिंचवड: प्रेमाच्या त्रिकोणातून पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. नकुल भोईर हा सामाजिक कार्य करणारा ध्येयवेडा तरुण होता. पत्नी चैतालीला नगरसेवक करायचं होतं. परंतु, पत्नीचं प्रेम त्यांच्यातील दुरावा ठरलं. चैतालीने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवारच्या मदतीने पती नकुलला संपवलं. या सर्व घटनेमुळे नकुल आणि चैतालीची दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. नकुल आणि चैतालीचा प्रेमविवाह होता. हे विसरून चालणार नाही.
चैताली आणि नकुलच्या प्रेमाला सात वर्षांपूर्वी पिंपरी- चिंचवडच्या गल्लीतूनच सुरुवात झाली. चैताली नकुलच्या गल्लीत क्लासेससाठी येत असायची. नकुल नकळत चैतलीच्या प्रेमात पडला. त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. नकुलने चैतालीला लग्नाची मागणी घातली. तीन वर्षे प्रेमाचं नात टिकवल्यानंतर अखेर दोघांनी लग्नगाठ बांधायची ठरवली. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. सुखी संसाराला सुरुवात झाली. लग्नाच्या काही वर्षातच त्यांना दोन एक मुलगा व एक मुलगी झाले. त्यांचा सुखी संसार आणखी बहरत चालला होता. परंतु, त्यांच्या संसाराला दृष्ट लागली आणि चैताली आणि सिद्धार्थचं प्रेम प्रकरण सुरू झालं.
चैतालीला आगामी महानगर पालिकेत नगरसेविका बनवायचं असं ध्येय नकुलचं होतं. तयारी जोमात सुरू केली होती. सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी नकुलचे चांगले संबंध होते. त्याने कुठलाही राजकीय वारसा नसताना वेगळा ठसा उमटवला होता. परंतु, हे नियतीला मान्य नव्हतं. २४ ऑक्टोबरच्या पहाटे प्रियकर सिद्धार्थच्या मदतीने नकुलची गळा दाबून हत्या करण्यात आली. आधी केवळ पत्नीने हत्या केल्याचं वाटत असताना यात सिद्धार्थचा ही सहभाग असल्याचं पोलिसांनी उजेडात आणलं.
या प्रेमाच्या त्रिकोणातून नकुल आणि चैतालीची दोन्ही मुले मात्र आई वडिलांवाचून पोरकी झाली आहेत. नकुलच्या आईचं वय देखील जास्त असल्याने मुलांचं भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून मित्रांकडून आर्थिक मदत केली जात आहे. दोन्ही मुलं तान्हुली आहेत. आई आणि वडीलांविषयी त्यांना पुसटशी कल्पना नाही. त्यांचं भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून नकुलच्या मित्रांकडून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. विवाहबाह्य प्रेम संबंध टोकाला गेल्यास काय होऊ शकतं? याचं हे उदाहरण आहे. आपल्या मुलांचा विचार करून दोघांनी वागायला हवं अशी सध्याची परिस्थिती आहे. मोबाईल आणि अन्य गोष्टींमुळे पती आणि पत्नींमध्ये दुरावा वाढत चालला आहे. हे कुणीही नाकारू शकत नाही. अशा वेळी दोघांनी एकमेकांना सांभाळून घेणं नक्कीच गरजेचं आहे.
चैताली मद्यपान करत असायची…
चैताली मद्यपान करत असायची. यावरून नकुल आणि तिच्यामध्ये अनेकदा टोकाचे वाद झाले. याच चैतालीच्या मद्यपानाच्या व्यसनाला कंटाळून काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे. कपड्याचं दुकान, चारचाकी गाडी, सोन्याचे दागिने हे सर्व चैतालीच्या नावावर होतं. कर्ज घेऊ नकोस, मद्यपान करू नकोस, असं वारंवार नकुल सांगायचा. हेच सांगणं त्याच्या जीवावर बेतलं, आपल्याच पत्नीने, जिच्यावर नकुलने जिवापाड प्रेम केलं, तिने त्याचा जीव घेऊन शेवट केला.
