पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे नेते संजय जगताप यांना अटक झालेली नसतानाही, त्यांना निवडणुकीमध्ये पैसे वाटताना अटक झाल्याचे छायाचित्र फेसबुक व व्हॉट्स अॅप वर टाकून बदनामी केल्याच्या आरोपावरून आमदार विजय शिवतारे यांचे पुत्र विनय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराच्या निषेधार्थ शुक्रवारी सासवडमध्ये बंद पाळण्यात आला. या प्रकरणी विनय यांना अटक झाली नाही, तर सोमवारी रस्ता अडवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सासवड पोलिस ठाण्यात सचिन दुर्गाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा २०१४ कलम ५००, ५०१, ६६अ अनुसार बदनामी केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. जगताप यांना अटक झाल्याचे छायाचित्र दोनतीन दिवसांपासून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर फिरत होते. ही घटना खोडसाळपणाने केल्याचा आरोप करत जगताप यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी सासवड पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. पुण्याच्या निवडणुकीत संजय जगताप यांच्या बाबतीत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार विनय शिवतारे यांनी घडवून आणल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सासवड बंद पालण्यात आला.
पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांनी सांगितले, की अशा तक्रारीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून दोन दिवसांत कारवाई केली जाईल. दरम्यान, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण व युवक अध्यक्ष गणेश मेमाणे यांनी सांगितले, की सोमवापर्यंत कारवाई न झाल्यास सासवड येथे व बारामती लोकसभा मतदार संघात रस्ता अडवून आंदोलन केले जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2014 रोजी प्रकाशित
संजय जगताप यांची ‘बदनामी केल्याबद्दल आमदार शिवतारेंच्या मुलावर गुन्हा
निवडणुकीमध्ये पैसे वाटताना अटक झाल्याचे छायाचित्र फेसबुक व व्हॉट्स अॅप वर टाकून बदनामी केल्याच्या आरोपावरून आमदार विजय शिवतारे यांचे पुत्र विनय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
First published on: 19-04-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook whats up crime congress shiv sena