लष्कर भरतीच्या परीक्षेत पास करून देतो म्हणत तरुणांना गंडवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. आरोपींनी तब्बल १९ मुलांची फसवणूक करत पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. यात लष्कराच्या भरती विभागातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेनसिंग लालासिंग रावत (वय ४५ रा. पिंगळे वस्ती, मुंढवा, रवींद्र राठोड रा राजस्थान) आणि रिक्रुटमेंट ऑफिसमधील कर्मचारी जयदेव सिंह परिहार असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथे होणाऱ्या सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेत काही मुलांची लाखो रूपयांची फसवणूक करण्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वेनसिंग लालासिंग रावत, रवींद्र राठोड आणि लष्करातील हवालदार जयदेव सिंह परिहार यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हवालदार जयदेव सिंह परिहार यांनी कॅम्प येथील लष्कराच्या कार्यालयात परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यास आलेल्या त्यातील काहींना हेरून, “माझी लष्करातील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. मी तुम्हाला पास करून देतो,” असं सांगितलं. तसेच “तुमचे काम झाल्यावर मला प्रत्येकी एक ते दोन लाख द्या,” असं सांगून त्या मुलांचे मूळ कागदपत्र स्वत:च्या ताब्यात घेतले. तसेच मागील पंधरा दिवसापासून मुलांचे लोहगाव या ठिकाणी शिक्षक नेमून क्लास घेण्यात आले. हा सर्व प्रकार ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून समोर आला आहे. या तिघांची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake army recruitment racket busted by police in pune bmh 90 svk
First published on: 01-11-2020 at 18:49 IST