पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या कामगारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चोरट्याला बाणेर पोलिसांनी अटक केली.
श्रीराम विकास हानवते (वय ३३, रा. एलिगंट रेसीडन्सी, यमुनानगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याबाबत किसनकुमार पोरराराम ध्रुव (वय २७, रा. पाषाण) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तो मूळचा छत्तीसगडचा आहे.

बाणेर येथील पारपत्र कार्यालयाजवळ १९ ऑक्टोबर रोजी ध्रुव याला हानवते याने पोलीस असल्याची बतावणी करून लुटले होते. धुव्र आणि त्याच्या मित्राने दिवाळीनिमित्त एका बँकेच्या एटीएममधून आठ हजार रुपये काढले होते.

पारपत्र कार्यालयासमोर हानवते दुचाकीवरून आला. त्याने खाकी रंगाचे जॅकेट घातले होते. पोलिसांसारखे बूटही त्याने घातले होते. हानवते यांनी धुव्र आणि त्याच्या मित्राला अडवले. पोलीस असल्याची बतावणी केली. तुम्ही चोरी केली आहे, असे सांगितले. तुमची झडती घ्यायची आहे, असे सांगून हानवतेने आधारकार्ड दाखविण्यास सांगितले. पसार होण्याचा प्रयत्न केला तर गोळी मारेल, अशी धमकी दिली. दोघांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. दोघांकडील १३ हजारांची रोकड लांबवून तो पसार झाला. घाबरलेला ध्रुव आणि त्याचा मित्र बाणेर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

हानवते दुचाकीवरून पसार झाला होता. एका दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढला. हानवते याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, उपनिरीक्षक संदेश माने, पोलीस कर्मचारी बाबा आहेर, किसन शिंगे, अप्पा गायकवाड, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, गजानन अवतिरक, प्रदीप खरात, प्रीतम निकाळजे यांनी ही कामगिरी केली.

तोतयाविरुद्ध एटीएम तोडफोड, लूटमारीचे गुन्हे

आरोपी हानवते हा सराइत आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एटीएमची तोडफोड करून रोकड चोरीचा प्रयत्न, तसेच निगडी पोलीस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा दाखल आहे. प्राथमिक तपासात हानवतेने एटीएममधून पैसे काढणाऱ्या परराज्यातील कामगारांना पोलीस असल्याची बतावणी करून लूटमारीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.