गेल्या दहा दिवसांत जिल्ह्य़ात तीन ठिकाणी बनावट औषधांचा साठा सापडला असून हा साठा मुंबईतील पुरवठादारांकडून पुरवला गेल्याचे निदर्शनास आले आहे. बारामतीला दोन ठिकाणी, तर केडगावला एका ठिकाणी ‘डय़ूफॅस्टॉन’ या गोळ्यांच्या ‘बीईबीआर ४०२३’ या बॅचचा बनावट साठा पकडण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या गर्भपाताच्या समस्येवरील उपचारांमध्ये हे औषध वापरले जाते.
डय़ूफॅस्टॉनच्या या विशिष्ट बॅचचा साठा मागे घेण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या असल्याची माहिती औषध विभागाचे सह आयुक्त बी. आर. मासळ यांनी दिली. औषध विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून १८ जानेवारीला औषध निरीक्षक व्ही. पी. खेडकर आणि एस. बी. पाटील यांनी केडगाव येथील ‘गणेश मेडिकल डिस्ट्रिब्यूटर्स’ या दुकानात छापा घातला होता. या छाप्यात डय़ूफॅस्टॉन औषधाच्या बीईबीआर ४०२३ या बॅच क्रमांकाच्या ६२० बनावट गोळ्यांचा साठा सापडला. हा साठा विक्रेत्याने विलेपार्ले येथील ‘न्यू एम्पायर केमिस्ट शॉप क्र. ३’ या पुरवठादाराकडून घेतला होता. चौकशीत या बनावट गोळ्यांचे उत्पादन आपण केले नसल्याचे पुरवठादाराने सांगितले. भारतीय दंडविधान कलम ४२० आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत संबंधित औषध विक्रेता आणि पुरवठादार यांच्यावर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या औषधाच्या याच बॅच क्रमांकाचा बनावट साठा १० जानेवारीला बारामतीतील ‘टेकवडे मेडिकल अँड जनरल स्टोअर्स’ आणि ‘चंदन डिस्ट्रिब्यूटर्स’ या विक्रेत्यांकडेही सापडला होता. हा साठा मुंबईतील ‘जे. बी. फार्मा’ या पुरवठादाराकडून खरेदी केल्याचे स्पष्ट झाले होते. या तिघांवरही बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.