पुणे : भारताने टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर जल्लोश करणाऱ्या नागरिकांना धमकाविणाऱ्या तोतया पोलिसाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांचे बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे.

सुमंत किशोर पार्टे (वय २२, सध्या रा. शोभा टाॅवर, पूना हाॅस्पिटलजवळ, नवी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई राहुल सोनार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी मध्यरात्री भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागात जल्लोश करण्यात आला. अलका चित्रपटगृहाजवळ मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास काही तरुण जल्लोश करत होते. त्यावेळी खाकी रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या सुमंत पार्टे याने जल्लोश करणाऱ्या नागरिकांना हटकले. त्यांना बंदुकसदृश वस्तूने मारहाण केली. दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांना धमकावून मारहाण केली. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली.

हेही वाचा – पुण्यात झिकाचा धोका वाढला! गर्भवतीला संसर्ग; संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू

हेही वाचा – कुष्ठरोग निर्मूलनापासून महाराष्ट्र दूरच! वर्षभरात राज्यात २० हजार रुग्ण आढळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पार्टेला पकडले. पार्टेने पोलीस असल्याची बतावणी करून आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पार्टेला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांचे बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.