दामोदर दत्तात्रेय बेडेकर म्हणजे कोण हे फार तर घरची मंडळी सांगू शकतील. पण अण्णा बेडेकर म्हटल्यास १९७५ किंवा त्यापूर्वीचे पुणेकर तातडीने म्हणतील, ‘अण्णा बेडेकर म्हणजे बेडेकर मिसळ’. हे म्हणताना त्यांना आठवेल ते, नारायण गेटाजवळचे मिसळ मिळणारे छोटेखानी पण उत्तम चालणारे दुकान. त्यांना आठवेल, जराही झगमगाट नाही, एकटे मालकच सर्व कामे करीत असत. परिणामी गर्दी अटळच तरीही शांतपणे वाट बघत बसलेली गिऱ्हाइके आणि अर्धी चड्डी, सदरा, टोपी घातलेले, नम्रता आणि खटय़ाळपणा जपणारे दुकानाचे मालक दामोदर दत्तात्रेय ऊर्फ अण्णा बेडेकर.
अण्णांच्या दुकानात बसायला लाकडाची बाकडी आणि समोर साधी टेबले, त्यावरच्या बरणीत दाण्याचे लाडू, ग्राहकांच्या गर्दीतून काढीत मिसळ, र्ती किंवा पावाचा ढीग घेऊन ग्राहकालाच ‘अण्णा, पाव हवा का?’ विचारणारे अण्णा आठवल्याशिवाय राहणार नाहीत. इथे ग्राहक मालकांना अण्णा म्हणत, मालक ग्राहकांना अण्णांचं म्हणायचे इतकेच नाही, तर ग्राहक एकमेकास ‘अण्णा, जरा सरकून घ्या’ किंवा ‘अण्णा, बरेच दिवस दिसला नाहीत’ असे म्हणत असत. खूप गर्दी असल्यास ग्राहक स्वयंसेवकांचे काम करून अण्णांना सहकार्य करीत. एकूण सर्व हॉटेलच अण्णामय होत असे. अण्णांच्या मिसळीला किती गुण द्यायचे, र्तीला किती गुण द्यायचे, त्यांच्या अदबीला किती हे ठरविणे कठीण. र्तीचा आस्वाद घेतला की रुमाल शोधायलाच हवा. कारण स्वाद घेताच तोंडासोबत नाकालाही पाणी सुटत असे. म्हणून जाणकार खवय्ये आधी रुमाल हाती घेत आणि मगच चमच्याला हात घालीत असत.
रविवार सकाळ म्हणजे तोबा गर्दी. जितकी गिऱ्हाइके आत त्याच्या दुप्पट बाहेर. कारण निम्मेजण पार्सल नेणारे. पण अण्णा शांतपणे दोन्ही आघाडी सांभाळत असत. आतल्यांना जरा अधिक वेळ लागला तर ते शांतपणे बरणीतला लाडू खात असत, काही जण र्तीने तोंड पोळल्यास शमविण्यासाठी लाडू वापरात.
मिसळ, पाव, र्ती आणि चहा झाला की एक जथा बाहेर पडे आणि लगोलग दुसरी बॅच आत शिरत असे. नियम नसला तरी संकेत असा की मिसळ सकाळी तर भजी सायंकाळी. पण चव, अदब आणि आपुलकी जशीच्या तशी. फरक इतकाच, की अण्णा सकाळी युद्ध पातळीवर काम करीत असत, तर रात्री शांतपणे.
१९५५ पासून हे अव्याहतपणे सुरू आहे. त्या काळी पुण्यात कोल्हापुरी मिसळ मिळत नसे आणि अण्णा बेडेकरांची मिसळ पुरेशी होती. एकदा बेडेकर मिसळ खाल्ली की सहसा माणूस अन्यत्र जात नसे. कारण मिसळीसाठी लागणारे फरसाण अण्णा घरीच बनवीत. आजही यात बदल नाही. संगीतात जशी घराणी असतात तशी मिसळीतही असावीत, एका घराण्याचा शागीर्द सहसा दुसरीकडे जात नाही. अण्णांची मिसळ खाणारे अण्णांची साथ सोडत नाहीत. कारण बेडेकर मिसळ हा ब्रँड बनला आहे.
रहदारी वाढली, वाहने लावायला जागी नाही. या कारणासाठी मध्य वस्तीतील अनेक व्यवसाय बंद पडले. पण बेडेकर टी स्टॉल चालू आहे. जुनी जागा सोडावी लागली. मात्र १९८० मध्ये नव्या वास्तूत मुंजाबा बोळात बेडेकर टी स्टॉल सुरू झाला. नवी जागा, नवे फर्निचर इतकाच काय तो बदल झाला आहे, पुढची पिढी काम पाहत आहे. पण चव आणि अगत्य कायम आहे. परदेशात स्थिरावलेला सुखावलेला नॉन रेसिडेन्ट पुणेकर चुकून माकून पुण्यात आलाच, तर एक दिवस बेडेकर मिसळीसाठी नक्की ठेवतो.
चारुचंद्र भिडे – charubhide@gmail.com