पुणे : पीकविमा योजनेवर राज्यातील शेतकऱ्यांच्या अक्षरक्षा: उडय़ा पडत आहेत. मागील वर्षी म्हणजे खरीप हंगाम २०२१ मध्ये ८४ लाख ७ हजार ३२८ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. यंदा त्यात मोठी वाढ होऊन ८ ऑगस्टपर्यंत ९५ लाख ४२ हजार ४४८ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे. बँकांकडे आलेल्या अर्जाची माहिती पीकविमा संकेतस्थळावर भरली जात आहे. त्याची अंतिम मुदत १६ ऑगस्ट असून, पीकविम्यासाठीच्या अंतिम अर्जाची संख्या अजून तीन लाखांनी वाढण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकरी व्यक्त करीत आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत आठ ऑगस्ट रोजीची अर्ज संख्या अकरा लाखांनी जास्त आहे. त्यात आणखी भर पडणार आहे, त्यामुळे विमा योजनेला शेतकऱ्यांच्या भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यापासून अतिवृष्टी, पूर, संततधार पावसात राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आजवर सुमारे दहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रमाण वाढल्याचा आणि कृषी खात्याकडून होत असलेल्या जागृतीचा परिणाम म्हणून शेतकरी मोठय़ा संख्येने पीकविमा काढत आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले नुकसान काही प्रमाणात भरुन निघावे अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

विभागनिहाय अर्ज

नाशिक विभागात सर्वाधिक ४० लाख ७ हजार ९८५, लातूर विभागात ३६ लाख १५ हजार ३७९, औरंगाबाद विभागात ३१ लाख ४८ हजार ७४१, अमरावती विभागात १५ लाख ४५ हजार ६२९, नागपूर विभागात २८ लाख १० हजार ७०, पुणे विभागात ४ लाख २५ हजार १९८, कोकण विभागात ८४ हजार ४४ आणि सर्वात कमी कोल्हापूर विभागात ३४ हजार ४०२ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत.

५६ लाख ६७ हजार ७६९ हेक्टरवरील पिके संरक्षित

आजवर ९५ लाख ४२ हजार ४४८ शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याचा विमा भरून खरिपातील ५६ लाख ६७ हजार ७६९ हेक्टरवरील पिके संरक्षित केली आहेत. या संपूर्ण क्षेत्राची विमा रक्कम २७३६८.४६ कोटी इतकी होते. त्यातील शेतकरी हिस्सा ३४०.९५ कोटी, राज्याचा हिस्सा १८५९.३४ कोटी, केंद्र सरकारचा हिस्सा १८५६.२९ कोटी इतका आहे. एकूण विमा हप्ता ४३५६.५७ कोटींचा आहे.

शेतकऱ्यांनी थेट अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे. बँकांकडे आलेल्या अर्जाची माहिती संकेतस्थळावर भरण्याचे काम सुरू आहे. हे काम १६ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अजून तीन लाख अर्जाची भर पडेल, असा अंदाज आहे.

विनयकुमार आवटे, मुख्य सांखिक, कृषी विभाग