सदोष मोबाइल संचाची विक्री केल्याप्रकरणी ग्राहक मंचाने मायक्रोमॅक्स कंपनीला फटकारले. नादुरुस्त मोबाइल संच परत घेऊन ग्राहकाला पैसे परत करण्याचा आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. तसेच नुकसानभरपाई आणि तक्रारअर्जाच्या खर्चाची रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य ओंकार पाटील आणि क्षितिजा कुलकर्णी यांनी मायक्रोमॅक्स कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेला दावा निकाली काढत आदेश दिले आहेत. शनिवार पेठेतील रहिवासी सत्येंद्र राठी यांनी अ‍ॅड. ए. एस. ढोबळे यांच्यामार्फत मोबाइल इन्फिनिटी सोल्युशन्स, नारायण पेठ आणि मायक्रोमॅक्स इन्फॉरमॅटिक्स लि. दिल्ली यांच्याविरोधात गेल्या वर्षी दावा दाखल केला होता. राठी यांनी मोबाइल ग्लोब एंटरप्रायजेस येथून ५ मे २०१५ रोजी मायक्रोमॅक्स कंपनीचा १९०० रुपये किमतीचा मोबाइल संच खरेदी केला होता. त्यानंतर चार महिन्यांत राठी यांचा मोबाइल संच नादुरुस्त झाला होता. राठी यांनी नारायण पेठेतील मायक्रोमॅक्स कंपनीचे मोबाइल दुरुस्ती केंद्र असलेल्या मोबाइल इन्फिनिटी सोल्युशन्स येथे मोबाइल संच दुरुस्तीसाठी दिला होता.

मोबाइल दुरुस्ती केंद्रातून राठी यांना मोबाइल संच दुरुस्त करून देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा मोबाइल संच नादुरुस्त झाला. मोबाइल संच खरेदी केल्यानंतर चार महिन्यांत मोबाइल नादुरुस्त झाल्याने राठी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे वकील अ‍ॅड. ढोबळे यांच्यामार्फत ग्राहक मंचात ९ जून २०१६ रोजी दावा दाखल केला होता. या दाव्यावर नुकतीच सुनावणी झाली. राठी यांनी मोबाइलची किमतीपोटी १९०० रुपये, नुकसानभरपाईपोटी पंधरा हजार रुपये आणि तक्रारअर्जाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये कंपनीकडून देण्यात यावेत, अशी मागणी दाव्यात केली होती. दरम्यान, मायक्रोमॅक्स कंपनीच्या वतीने कोणीही सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाही. ग्राहक मंचाने राठी यांच्या बाजूने निकाल देत त्यांना मायक्रोमॅक्स कंपनीला सदोष मोबाइल संचाची विक्री केल्याप्रकरणी फटकारले. राठी यांचा नादुरुस्त मोबाइल संच परत घ्यावा, मोबाइल खरेदीची रक्कम, नुकसानभरपाई आणि तक्रारअर्जाच्या खर्चापोटी पाचशे रुपये द्यावेत, असे आदेश ग्राहक मंचाकडून देण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faulty mobile selling at pune
First published on: 02-09-2017 at 04:27 IST