वानवडीत बनावट पनीर तयार करणाऱ्या एका उत्पादकावर अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) कारवाई करण्यात आली. एफडीएकडून ८०० किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले. वानवडीतील टिपटॅाप डेअरी प्रॅाडक्टस या दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती उत्पादकाच्या कारखान्यात बनावट पनीर तयार केले जात असल्याची माहिती एफडीएच्या पथकाला मिळाली. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. तेथून ८०० किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले.

बनावट पनीर तयार करण्यासाठी दुधाची भुकटी तसेच पामतेलाचा वापर करण्यात येत असल्याचे आढळून आले. तेथून ३५० किलाे दुधाची भुकटी, २७० किलो पामोलिन तेल जप्त केले. या कारवाईत एकूण मिळून तीन लाख २९ हजार २५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पनीर नाशवंत असल्याने एफडीएच्या पथकाने जागेवर जप्त केलेले पनीर नष्ट केले. कारखान्यातून जप्त केलेल्या बनावट पनीरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा : पिंपरी : अपुऱ्या सोयीसुविधांच्या निषेधार्थ पिंपरीत रहिवाशांचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. एफडीएचे सहायक आयुक्त बाळू ठाकूर, अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश खोसे आणि पथकाने ही कारवाई केली आहे. सणासुदीच्या काळात बनावट तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येते. असे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर (१८००२२२३६५) संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन सहआयुक्त संजय नारगुडे यांनी केले.