गुटखा आणि पान मसाल्यावरील सध्या केवळ एक वर्षांसाठी असलेली बंदी वाढवून कायमचीच बंदी घालावी, यासाठी सरकारला पत्र दिले असल्याची माहिती अन्न आणि औषध विभागाचे (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांनी दिली आहे.
‘सलाम मुंबई’ या सामाजिक संस्थेने कामगारांच्या तंबाखूमुक्तीसाठी ‘हेल्थ फस्र्ट’ या कार्यक्रमाची रचना केली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या साहाय्याने संस्थेतर्फे मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी झगडे बोलत होते.
संस्थेच्या संचालक पद्मिनी सोमाणी, कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. पंकज चतुर्वेदी, एमसीसीआयएचे अध्यक्ष एस. के. जैन, संचालक अनंत सरदेशमुख, बजाज इलेक्ट्रिकल्सचे मनुष्यबळ विभाग प्रमुख अरुण पारधी या वेळी उपस्थित होते.
झगडे म्हणाले, ‘‘गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घातल्यापासून आतापर्यंत तेरा कोटी रुपयांचा गुटखा अन्न व औषध विभागाने जप्त केला आहे, तर सहा कोटी रुपये किमतीचा गुटखा नष्ट करण्यात आला आहे. विडी आणि सिगारेटवर पूर्णपणे बंदी घालण्याचे काम अवघड असले तरी गुटख्यावर एका वर्षांसाठी असलेली बंदी वाढवून ती कायम करावी यासाठी मी सरकारला पत्र दिले आहे.’’  
सुळे यांनी सांगितले की, ‘‘गुटख्यावरील बंदीचे राज्यात सगळीकडे पालन होताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे युवकांद्वारे गुटख्याच्या प्रश्नाबाबत जनजागृती करून होळीच्या दिवशी गुटख्याची होळी करण्यात येणार आहे.’’
डॉ. चतुर्वेदी म्हणाले, ‘‘एका सर्वेक्षणानुसार बीपीओ कंपन्यांमधील साठ टक्के तरुण धूम्रपान करतात, तर चाळीस टक्के रेल्वे कर्मचारी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचा वापर करतात. तसेच कामाच्या ठिकाणीच तंबाखूचा वापर होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते.’’
सलाम मुंबईतर्फे बनविण्यात आलेला तंबाखूमुक्ती कार्यक्रम बजाज इलेक्ट्रिकल्स या कंपनीत यशस्वीरीत्या राबविण्यात आला असून इतरही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या तंबाखूमुक्तीसाठी हा कार्यक्रम राबवावा, असे आवाहन संस्थेतर्फे सोमाणी यांनी केले.  
 

 

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.