जीवे मारण्याची धमकी प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा
भागीदारीतील व्यवहारात गुंतवलेली रक्कम परत मागितल्याने व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांकडून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी जयंतीलाल ताराचंद ओसवाल, प्रवीण ताराचंद ओसवाल आणि राकेश ताराचंद ओसवाल (सर्व रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनोज हिम्मतलाल शहा (वय ५२, रा. हाईड पार्क, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहा आणि ओसवा परिचित आहेत. मुंढवा भागातील एका जमीन खरेदी प्रकरणात त्यांनी भागीदारी स्वरुपात व्यवहार केला होता. ओसवाल यांनी शहा यांच्याकडून ४५ लाख रुपये ३० टक्के भागीदारी स्वरुपात घेतले होते. २०१८ मध्ये त्यांनी या व्यवहारातील अंदाजे ३३ गुंठे जागा २० कोटी ५० लाख रुपयांना विकली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शहा यांना ३० टक्के भागीदारीप्रमाणे सहा कोटी १५ लाख रुपये देणे अपेक्षित होते. मात्र, ओसवाल यांनी त्यांना ठरल्या प्रमाणे पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे शहा यांनी ओसवाल यांच्याकडे विचारणा केली. शहा यांनी जयंतीलाल ओसवाल यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा पैसे परत मागितले जीवे मारू अशी धमकी दिली. शहा यांना पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला. याबाबत शहा यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला. त्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटोळे तपास करत आहेत.