रेल्वाचा एक चालक (लोको पायलट) दोन दिवसांपासून गायब झाल्याने पुणे रेल्वेमध्ये खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून हा लोको पायलट गेल्या दोन दिवसांपासून घरी किंवा कार्यालयात परतलेला नाही. रेल्वे प्रशासनाने त्याचा तातडीने शोध घ्यावा, अन्यथा काम बंद आंदोलन केले जाईल. पुण्यातून एकही रेल्वे धावू देणार नाही, असा इशारा रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा- पुणे: राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये वाढ; १४ विद्यापीठांतील ९० हजार ३०० स्वयंसेवकांना मंजुरी

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सचिव सुनील बाजारे यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करतानाच कामबंदचा इशाराही दिला आहे. त्याचप्रमाणे संबंधित रेल्वे चालकच्या पत्नीने पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले आहे. हरिषचंद्र अंकुश असे या रेल्वे चालकाचे नाव आहे. अंकुश हे शुक्रवारी अकरा तासांचे काम करून घरी निघाले होते. मात्र, वरिष्ठांकडून त्यांना आणखी चार ते पाच तास कामावर थांबण्याची सूचना करून त्याबाबत तगादा लावण्यात आला. ते शक्य नसल्याने विश्रांतीची गरज असल्याचे सांगून अंकुश कार्यालयातून निघून गेले.

त्यानंतर वरिष्ठांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि ऐकले नाही, तर बदली करण्याची धमकी दिल्याचे अंकुश यांच्या पत्नीने म्हटले आहे.
शनिवारपासून अंकुश गायब आहेत. सोमवारीही ते घरी किंवा नोकरीवर परतले नाहीत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पत्नीने सोमवारी पुणे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर आंदोलन केले. ४८ तासांमध्ये त्यांना शोधून आणा, अन्यथा पुण्याहून एकही रेल्वेचालू देणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. त्याचप्रमाणे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली.

हेही वाचा- राज्यात बी.एड. प्रवेशांना अल्प प्रतिसाद; पहिल्या फेरीत सात हजार ७२७ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

हरिषचंद्र अंकुश यांच्या पत्नी आणि रेल्वे मजदूर संघाच्या कर्मचाऱ्यांची पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांना निवेदन दिले आहे. रेल्वे या प्रकरणात चौकशी करून योग्य ती पावले उचलेल. त्याचप्रमाणे पोलिसांच्या कामातही सहकार्य केले जाईल, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

हेही वाचा- पुणे: सांगवीतील रोजगार मेळाव्यात ११०० जणांना जागेवर नियुक्तीपत्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोको पायलटला रेल्वे प्रशासनाने तातडीने शोधण्यासाठी मदत करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. या प्रकरणात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा सचिव सुनील बाजारे यांनी दिला.