पिंपरी: पिंपरी पालिकेची रूग्णालये व दवाखान्यांमध्ये आतापर्यंत मिळणारे अत्यल्प दरातील उपचार यापुढे मिळणार नाहीत. वैद्यकीय सेवा तसेच औषधोपचारांकरिता शासन दराप्रमाणे शुल्कआकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पालिका रूग्णालयांमधील उपचार महागणार आहेत. ही शुल्कवाढ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेची ८ रुग्णालये आणि २९ दवाखान्यांमधून शहरवासियांना आरोग्य सुविधा दिल्या जातात. अत्यल्प दरात हे उपचार मिळत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराव्यतिरिक्त राज्याच्या विविध भागातील रूग्ण येथील उपचारांचा लाभ घेतात. गेल्या १२ वर्षात शुल्कवाढ करण्यात आली नव्हती, असे सांगत आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला आणि स्वत:च्या प्रशासकीय अधिकारात तो मंजूरही केला.

त्यानुसार, केसपेपर १० रूपयांऐवजी २० रूपये, मलमपट्टी १० रूपयांऐवजी २० रूपये, एक्स रे ४० रूपयांऐवजी १२५ रूपये, सोनोग्राफी ९० ऐवजी १२० रूपये अशाप्रकारे दरवाढ करण्यात आली आहे. रूग्णवाहिकांचे दर सध्या प्रति १५ किलोमीटर ११० रूपये आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी असणारे १० रूपये यापुढे २० रूपये प्रति किलोमीटर असा दर करण्यात आला आहे. शासननियमानुसार सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आणि दारिद्रय रेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा पूर्वीप्रमाणेच असतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व पिवळ्या व केशरी शिधापत्रिका कार्डधारक रूग्णास मोफत सुविधा दिली जाईल. मात्र, जे रूग्ण केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. मात्र, फुले जनआरोग्य योजनेत बसत नाहीत, फक्त अशांना शासनाच्या दरांनुसार दरआकारणी केली जाणार आहे.

दरम्यान, आयुक्तांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. याबाबत शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. आजपर्यंत पालिका रुग्णालयातील उपचार व शस्त्रक्रियांमुळे कित्येकांचे प्राण वाचले आहेत. मोफत उपचारामुळे गोरगरिब रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आयुक्तांनी शुल्कवाढीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

गेल्या पाच वर्षांत महापालिकेतील वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार थांबवल्यास तसेच वैद्यकीय विभागातील अधिकारी, ठेकेदार आणि राजकीय नेत्यांची भ्रष्ट साखळी मोडीत काढल्यास कोणत्याही शुल्कवाढीची गरज भासणार नाही.

अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fees hike in hospitals and dispensaries of pimpri chinchwad municipal corporation pune print news zws
First published on: 13-07-2022 at 19:50 IST