पुणे : वास्तुकला अभ्यासक्रमात लवकरच फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच, फेरोसिमेंटसह अन्य विषयांवरील प्रगत संशोधनासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना बंगलोरमध्ये ‘सीओए’च्या नियोजित कार्यालय परिसरात करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रीय वास्तुकला परिषदेचे (सीओए) अध्यक्ष अभय पुरोहित यांनी दिली. तसेच फेरोसिमेंट तंत्रज्ञानातील अधिक संशोधनासाठीचे काम केंद्र सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, उद्योगांच्या आर्थिक सहकार्यातून पुढे जाऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) व फेरोसिमेंट सोसायटी यांच्यातर्फे आयोजित ‘कला, विज्ञान व तंत्रज्ञानातील फेरोसिमेंटचे बांधकाम’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत पुरोहित बोलत होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य जयंत इनामदार, बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, फेरोसिमेंट सोसायटीचे अध्यक्ष पी. पी. लेले, सोसायटीचे पदाधिकारी गिरीष सांगळे, नंदकुमार जाधव, पुष्यमित्र दिवेकर, परिषदेचे संयोजक डॉ. कल्याण सुंदरम्, व्हॅसकॉन इंजिनीअर्सचे प्रकल्प संचालक विवेक बोत्रे, अल्ट्राटेक सिमेंटचे संदीप बन्सल, आर्किटेक्ट्स इंजिनीअर्स ॲण्ड सव्हेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. महेश बांगड, परिषदेच्या सहनिमंत्रक डॉ. सुजाता मेहता या वेळी उपस्थित होते.

पुरोहित म्हणाले, ‘फेरोसिमेंट तंत्रज्ञानाबाबतचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाला पूरक आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या गुंतागुंतीच्या आकृतिबंधांसाठीचा फेरोसिमेंटचा वापर अपरिहार्य झाला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातही या तंत्रज्ञानासाठी खूप काही करता येईल. फेरोसिमेंटचा वापर करणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या माध्यमातून त्यातील नव्या शक्यता आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भात आजमावून पाहणे आवश्यक आहे. त्रिमितीय मुद्रणाच्या क्षेत्रात वास्तू उभारणीसाठी फेरोसिमेंटचा क्रांतिकारी वापर करण्यासंबंधीचे संशोधन सुरू आहे. पर्यावरणपूरक, हलके, मजबूत आणि कमी खर्चिक असणाऱ्या या तंत्रज्ञानाबाबत जगातील प्रमुख देश ठरण्यासाठी अधिक संशोधन करावे लागेल.