म्हशीचे शेण घरासमोर पडल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील काची वस्ती परिसरात घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हर्षल जनार्दन मल्लाव (वय ४३, रा. आरटीओ कार्यालयाजवळ, काची वस्ती) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- नवरात्रोत्सवासाठी फूल बाजार बहरला; पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम

दांडक्याने मारहाण

मल्लाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश उर्फ पिंट्या रमेश काची, चेतन रमेश काची, शैलेश रमेश काची यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्लाव यांच्या घरासमोर काची यांच्या म्हशीचे शेण पडले होते. मल्लाव यांनी काची यांना जाब विचारला. या कारणावरुन आरोपी काची यांनी दांडक्याने मारहाण केल्याचे हर्षल मल्लाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा- पुणे शहरात डेंग्यूचा ‘डंख’; जुलै ते सप्टेंबर महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली

पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शैलेश रमेश काची (वय ३०) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. काची यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हर्षल जनार्दन मल्लाव, राहुल जनार्दन मल्लाव (वय ४१), यश हर्षल मल्लाव (वय २०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्लाव यांच्या घरासमोर म्हैस गेल्याने आरोपी मल्लाव यांनी आरडाओरडा केला. शैलेश यांचा भाऊ निलेश याने आरोपींना विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी गजाने मारहाण केल्याचे काची यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक गोरड तपास करत आहेत.