पुणे : ‘भारत बंद’च्या दिवशी स्टॉल उघडा असल्याने दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते यांच्यावर आणि याबाबत तक्रार देण्यास गेल्यानंतर तक्रार न घेता मारहाण केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला असून, या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर यांच्यासह अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद हे कार्यकर्ते तसेच पोलीस निरीक्षक जानकर, सहायक पोलीस निरीक्षक मोहिते, सहायक फौजदार कामथे, हवालदार गरुड, पोलीस शिपाई नदाफ, सुब्बनवाड, महिाला पोलीस शिपाई सुरेखा बडे व इतर ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता ते ११ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान कोंढवा येथील कोर्णाक पूरम सोसायटीबाहेर आणि पोलीस ठाण्यात घडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वतीने भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. तक्रारदार यांच्या बहिणीचा स्टॉल उघडा असल्याने तो स्टॉल बंद करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आले होते. महादेव बाबर आणि अब्दुल बागवान यांनी त्यांच्या दुकानातील सामान, साहित्य रस्त्यावर फेकून देऊन जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर तक्रारदार कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. पण, त्यांची तक्रार दाखल करून न घेता उलट त्यांनाच पोलीस निरीक्षक जानकर, सहाय्यक निरीक्षक मोहिते व इतरांनी मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानूसार न्यायालयाने गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.