काही अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकात बदल
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अंतिम वर्षांची परीक्षा आजपासून (१२ ऑक्टोबर) सुरू होणार आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे काही अभ्यासक्रमांच्या विषयांच्या परीक्षा या १७ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहेत. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी साधारण अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे दोन लाख विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने, तर उर्वरित साधारण ५० हजार विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. ऑफलाइन परीक्षा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्य़ांत ११३ केंद्रांवर घेतली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी पद्धतीची माहिती होण्यासाठी ८ ऑक्टोबरपासून सराव चाचण्यांची सुविधा देण्यात आली. प्रत्यक्षात १ लाख ५२ विद्यार्थ्यांनी सराव चाचणी दिली. ही परीक्षा एका विद्यार्थ्यांला पाच वेळा देण्याची संधी होती. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक वेळ परीक्षा दिल्याने, साधारण ३ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांनी सराव चाचणी दिल्याची नोंद झाली. सराव चाचणीदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
दरम्यान, परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केला. काही तांत्रिक अडचणींमुळे काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा १२ ऑक्टोबरऐवजी १७ ऑक्टोबरला घेण्यात येणार असून, त्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
४० हजार विद्यार्थ्यांचे सराव परीक्षेकडे दुर्लक्ष
विषय राहिलेल्या (बॅकलॉग) सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी सराव चाचणी दिली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सोमवारी (१२ ऑक्टोबर) सरावाची पुन्हा एक संधी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
नियोजित वेळापत्रकात अचानक बदल नको
विद्यापीठाने काही विषयांच्या वेळापत्रकात बदल केला. मात्र अचानक वेळापत्रक बदलल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे परीक्षेबाबत विद्यापीठाने व्यवस्थित नियोजन करावे. अचानक वेळापत्रकात बदल करण्यात येऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.
