पुणे : ‘अंजीर आणि पेरूच्या बागा उद्ध्वस्त होतील, सुपीक शेतजमीन बाधित होईल,’ असे म्हणणे मांडून प्रस्तावित पुरंदर विमानतळाला काही शेतकरी विरोध करत आहेत, तर जमिनीच्या सातबाऱ्यावर ‘प्रकल्पग्रस्त’ या शिक्क्यामुळे तरुणांचे विवाह मोडल्याचे प्रकार घडल्याचा काहींचा दावा आहे. त्याचबरोबर विमानतळाची घोषणा आणि आराखडे ही चर्चा दशकभरापासून सुरू असल्याने अनिश्चितता, मोबदला मिळाल्यावर होणारे कौटुंबिक कलह असे अनेक मुद्देही पुढे आले आहेत. नवे प्रकल्प उभे राहत असताना घडत असलेल्या आर्थिक-सामाजिक बदलांचे चित्रच यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

‘सातबाऱ्यावर ‘प्रकल्पग्रस्त’ असा शिक्का बसला म्हणून माझ्या लग्नाला नकार मिळाला,’ असा अनुभव पारगाव मेमाणे येथील सागर मेमाणे सांगतात. ‘शिक्षण किंवा व्यवसायात फारशी मजल मारता आली नाही. शेती होती, म्हणून तीच आधार होती; पण आता शेतीही जाणार, मोबदला कधी मिळणार याची शाश्वती नाही. या अस्थिरतेमुळे आमच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे,’ अशा शब्दांत सागर यांनी व्यथा सांगितली.

‘प्रकल्पातील सात गावांपैकी पारगाव मेमाणे येथे ८० तरुणांनी वयाची पस्तिशी पार केली, तरी त्यांचे विवाह ठरलेले नाहीत. कुंभारवळणमध्ये ५० पेक्षा अधिक तरुणांनी चाळिशी ओलांडली आहे. वनपुरीमध्ये ४५ युवक अजूनही अविवाहित आहेत. त्यामुळे सुमारे २२५ तरुणांच्या संसाराला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. केवळ लग्नच नाही, तर घर बांधायचे, व्यवसाय उभारायचा, कर्ज घ्यायचे, शेतात विहीर घ्यायची किंवा नाही असे रोजच्या जगण्यातील निर्णयही प्रकल्पाच्या घोषणेत अडकून पडले आहेत.

सत्तांतर, जागाबदल, विरोधक-सर्मथक यांच्या राजकीय खेळ्या आणि अधिसूचनांच्या गोंधळात गावकऱ्यांचे सामाजिक जीवन विस्कळीत झाले आहे. खस्ता खात आयुष्य जगणाऱ्या वृद्धांना स्वतःच्या जमिनीवरून विस्थापित होण्याची भीती आहे. आधी शेती तरी होती, आता तीही नसेल. मग आम्ही मुलींच्या घरच्यांना काय सांगायचे? घरदार आहे, की फक्त नकाशावर एक नाव, असे प्रश्न तरुणांच्या पालकांसमोर आहेत,’ याकडे प्रकल्पग्रस्त दत्तात्रय मेमाणे लक्ष वेधतात.

‘काळ्या मातीवर खस्ता खाल्ल्या; पण पीकही सोन्यासारखे घेतले. तीच जमीन आमच्या हातून जाईल, याचे दु:ख जास्त आहे,’ असे शेतकरी विठ्ठल हगवणे कातर स्वरात व्यक्त होतात. ‘नवउद्योजक म्हणून दहा वर्षांपूर्वी व्यवसायात उतरलो. मात्र, पुरंदर विमानतळासाठी जागा जाणार असल्याने समस्या वाढल्या आहेत. जमिनीचा मोबदला मिळेल. परंतु, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन नव्याने व्यवसाय सुरू करणे जिकिरीचे होईल,’ असे मुंजवडी येथील एका गोट फार्मिंग आणि पोल्ट्री व्यावसायिकाने सांगितले.

‘अनेक ठिकाणच्या धरण प्रकल्पांतील बाधितांच्या दोन-तीन पिढ्या पुनर्वसनासाठी उंबरठे झिजवत आहेत, हे गावकरी जाणून आहेत. सातबाऱ्यावर ‘प्रकल्पग्रस्त’ असा शिक्का बसल्यावर मुलाचे लग्न मोडले, शेतीला कर्ज मिळत नाही, व्यवहार होत नाही. सरकारने या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना केवळ तांत्रिक, आर्थिक मुद्द्यांकडे न पाहता, गावकऱ्यांच्या भावनांचा, आर्थिक, कौटुंबिक भवितव्याचा विचार करूनच पुढचे पाऊल उचलावे,’ असे राजाभाऊ कुंभारकर आणि गावकरी सांगतात.

‘नातेसंबंधही तुटत चालले’

‘केवळ आमची धरणी मायच नाही, तर नातेसंबंधही तुटू लागले आहेत. भावा-बहिणींमध्ये, चुलत्या-पुतण्यात, लेक-जावई या नात्यांमध्ये फूट पडत आहे. उद्या जास्त पटींनी मोबदला वाढवून मिळेलही, तरी वेळ निघून गेल्यावर पैशाचे करायचे काय, हा विचार अनेक वृद्धांना भेडसावतो आहे. शेती, वारसा, नातेवाईक यांचा आयुष्यभर गोफ गुंफलेल्या वृद्धाला पैशाच्या प्रलोभनाची कुठलीही आवश्यकता नाही,’ असे ज्ञानेश्वर मेमाणे सांगतात.

‘शिवशाहीचा वारसा नष्ट होणार’

‘छत्रपती शिवाजी महाराज परगणा जाताना जुन्नर, खेड शिवापूर, सुपे या मार्गाने पारगाव मेमाणे येथे मुक्कामी असायचे. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या मोकळ्या जागेत त्यांच्या घोडदळाचा विसावा असायचा. हा वारसा, गावची विशेष ओळख पुसली जणार,’ अशी चिंता इतिहास संशोधक राज मेमाणे यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांची उद्विग्नता आणि विरोधाची कारणे समजून घेत आहे. राज्य सरकारकडे याबाबत माहिती देण्यात आली आहे. घोषणा झाल्यापासून सामाजिक जीवनावर परिणाम झाला असेल, हे मान्य आहे. परंतु राज्य सरकारने त्यांना भूमिहीन होऊ न देण्याचा निर्णय़ घेतला आहे. नक्कीच शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल. त्याचबरोबर बाधित कुटुंबातील तरुणांना कौशल्याधारित शिक्षण देऊन त्याच ठिकाणी नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. – वर्षा लांडगे, प्रांत अधिकारी,

पुरंदर पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ पुण्याचा विकास साधणार नसून, पश्चिम महाराष्ट्राबरोबर मराठवड्यातील बहुतांश भागाला याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे शेतमालासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होईल. – सुधीर मेहता, उद्योजक