देशातील ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब यांच्या घरावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामागील सूत्रधार शोधून त्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेशजी बागवे यांनी केली आहे.
पुणे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेशजी बागवे यांच्या नेतृत्वाखाली कॅम्पमधील डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर आज(रविवार) सकाळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, आबा बागुल, भीमराव पाटोळे, अविनाश बागवे आदींसह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
”देशातील राजकारणात शरद पवार यांना प्रतिष्ठा आहे. अशा प्रतिष्ठित नेत्याच्या घरावर हल्ला करणे हे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला अजिबात शोभणारे नाही. अशा हल्ल्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात घातक पायंडा पडू पाहातो आहे. याकरिता राज्य सरकारने हल्ल्यामागील सूत्रधार शोधून, त्यावर कारवाई करायला हवी तरच, अपप्रवृत्तींना आळा बसेल.”, असे रमेशजी बागवे यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले. याशिवाय, एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अनुकूल निकाल दिला असतानाही काही नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे करून कामगारांना भडकावले, असा आरोप बागवे यांनी केला.
तर, ”एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने सहानुभूतीची भूमिका ठेवली असताना एसटी कामगारांची दिशाभूल करण्यात आली आणि आंदोलन चुकीच्या मार्गाने नेले.”, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले आणि पवारांच्या घरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
आंदोलनाची सांगता सभेने झाली. या सभेत अभय छाजेड, अरविंद शिंदे, अॅड. अश्विनी गवारे आदींची भाषणे झाली. सर्व वक्त्यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि हल्ल्यामागचा सूत्रधार शोधून त्यावर कारवाई करा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली.