पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (एक्सप्रेस वे) वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वयंचलित वाहतूक नियंत्रण प्रणालीची (इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम – आयटीएमएस) वर्षपूर्ती होत असून, वर्षभरात २७ लाख वाहनचालकांना ई-चलन पाठवून २७०.४७ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. मात्र, वाहनचालकांकडून दंड भरण्याचे प्रमाण अत्यल्प असून, सुमारे २५० कोटी रुपयांच्या ‘ई-चलना’ची रक्कम थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सातत्याने नियमांचे उल्लंंघन केल्याने जास्त दंड असलेल्या वाहनचालकांची यादी प्रत्येक स्थानिक ‘आरटीओ’कडे पाठविण्यात आली असून, आता स्थानिक पातळीवर दंड वसूल होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव वाहने, इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहतूक मंदावणे आणि अपघाती मृत्यूच्या घटना रोखण्यासाठी परिवहन विभागाने या मार्गावर १९ जुलै २०२४ रोजी आधुनिक तंत्रज्ञानावार आधारित स्वयंचलित ‘आयटीएमएस’ प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार हलक्या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा प्रतितास १०० किलोमीटर, तर जड-अवजड वाहनांसाठी प्रतितास ८० किलोमीटर अशी आणि घाटमाथा परिसर आणि वळणाच्या, उताराच्या मार्गावर जड वाहनांसाठी प्रतितास ४० किलोमीटर अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली. वाहतुकीच्या नियमानुसार वाहन चालविताना ‘सीट बेल्ट’चे बंधन अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ‘आयटीएमएस’च्या ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसाठी ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात २७ लाख वाहनचालकांना ई-चलन पाठवून २७०.४७ कोटी रुपयांचा दंड ई-चलन पाठवून लागू करण्यात आला आहे. यापैकी १.६० लाख वाहनधारकांनी ई-चलनाचा दंड स्वत:हून भरला आहे. त्यानुसार सुमारे ३० कोटी रुपयांचा दंड प्राप्त झाला आहे. सुमारे २५० कोटी रुपयांचे ई-चलन वाहनधारकांनी भरलेले नसून, यामध्ये हलक्या आणि जड वाहनचालकांचा समावेश आहे.’

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ई-चलन पाठविण्यात आले आहे. ई-चलनाचा जास्त दंड असलेल्या वाहनचालकांची प्रत्येक स्थानिक आरटीओकडे माहिती पाठविण्यात आली असून, स्थानिक पातळीवर दंड वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. – संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

कारवाईचे स्वरूप

– नियमापेक्षा जास्त वेगमर्यादा असणे

– प्रमाणापेक्षा जास्त मालवाहतूक करणे

– सीट बेल्ट न लावता वाहन चालवणे

– वाहन चालविताना मोबाइलचा वापर

– वाहनाची मार्गिका बदलणे

– रस्त्याकडेला वाहन उभे करणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– चुकीच्या दिशेने वाहन चालवणे