लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील सदनिकेला शनिवारी आग लागली. आगीमुळे परिसरात घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्परतेने आग आटोक्यात आणल्याने जीवितहानी टळली.

वाघोली-केसनंद रस्त्यावरील कोनार्क ऑर्चिड सोसायटीतील बाराव्या मजल्यावरुन मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशाांनी अग्निशमन दलाला दिली. आग लागल्याने सोसायटीतील रहिवासी भयभीत झाले. या घटनेची माहिती मिळताच पुणे महानगर विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आग भडकल्याने तातडीने जादा कुमक मागविण्यात आली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सदनिकेत जाऊन जवानांनी पाणी मारले. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. सदनिकेतील गृहोपयोगी साहित्य जळाले. शॉर्टसर्किटमुळे किंवा घरातील दिव्यामुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-कोकण किनारपट्टीवरील प्रदूषण धोकादायक पातळीवर, रसायनांमुळे सागरी आणि मानवी आरोग्य धोक्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही वर्षांपासून वाघोली-केसनंद परिसरात बहुमजली गृहप्रकल्प साकारण्यात आले. खराडी माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील कर्मचारी या भागात वास्तव्यास आहेत.