पुणे : कोथरूड भागातील सुतार दवाखान्याजवळ असलेल्या बेकरीमध्ये शुक्रवारी पहाटे आग लागण्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. बेकरीत अडकलेल्या सहा कामगारांची त्वरीत सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली, तसेच मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने सोसायटीतील रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
कोथरूड भागातील सुतार दवाखान्याजवळ गोल्डन बेकरी आहे. शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास बेकरीला आग लागली. बेकरीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कोथरूड केंद्राला दिली. अग्निशमन दलाचे आधिकारी प्रकाश गाेरे यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बेकरीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. जवानांनी त्वरीत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बेकरीत कोणी अडकले आहे का नाही, याची खात्री जवानांनी केली. बेकरीत सहा कामगार होते. धुरामुळे ते झोपेतून जागे झाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज जवानांनी ऐकला. जवानांनी बेकरीतील सहा कामगारांनी बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
बेकरी एका इमारतीत तळमजल्यावर आहे. बेकरीतील साहित्याने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. धुरामुळे रहिवाशांना त्रास झाला, तसेच आगीची झळ इमारतीतील रहिवाशांनी पोहोचू नये म्हणून जवानांनी त्यांना बाहेर काढले. पाण्याचा मारा करून जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. शहरातील अनेक बेकरीत कामगार दाटीवाटीने राहतात. बहुतांश बेकरीतील कामगार हे परप्रांतीय आहेत. गॅसगळती किंवा शाॅर्टसर्किटमुळे बेकरीत आग लागण्याच्या घटना घडतात.
शिवाजीनगर आगारात पीएमपी बसला आग
शिवाजीनगर भागातील नरवीर तानाजी वाडी (वाकडेवाडी) पीएमपी आगारात शुक्रवारी पहाटे एका बसला आग लागली. आगीत बस जळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग नियंत्रणात आणली. नरवीर तानाजी वाडी भागात पीएमपीचे आगार आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास बसला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कसबा पेठ अग्निशमन केंद्राला मिळाली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख कमलेश चौधरी आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणी जखमी झाली नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी कमलेश चौधरी यांनी दिली.