पुणे : महापालिकेच्या वतीने शहराच्या प्रवेशद्वारांजवळ पाच अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. त्यांपैकी बाणेर येथे उभारण्यात येणाऱ्या पहिल्या वातानुकूलित स्वच्छतागृहाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित चार स्वच्छतागृहांचा प्रस्ताव स्थायी समितीत दाखल करण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे ४ कोटी ३१ लाख रुपये खर्चाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शहरात दररोज बाहेरगावावरून कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरात आल्यानंतर त्यांना सोयीसुविधा असलेली स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेने पाच ठिकाणी वातानुकूलित (एसी) स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला. या स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी खासगी ठेकेदाराकडे दिली जाणार आहे. त्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे.
महापालिकेची विविध भागांत सुमारे १२०० स्वच्छतागृहे आहेत. मात्र, यामध्ये विद्युतव्यवस्था, पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांकडून वापर टाळला जातो. तसेच, महापालिकेची महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची गैरसोय होते.
उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनीही स्वच्छतागृहांच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महापालिकेने शहराच्या प्रवेशद्वारावर वातानुकूलित स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहरातील पाच जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बाणेर जकात नाका, स्वारगेट एस. टी. स्थानकाच्या शेजारी, शेवाळवाडी, कात्रज आणि वाघोली येथे ही स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.
स्वच्छतागृहांतील सुविधा
स्वच्छतागृहात अंघोळ आणि कपडे बदलण्याची सुविधा असणार आहे. मोबाइल, लॅपटॉप चार्जिंग आणि वायफायची व्यवस्था केली जाणार आहे. या स्वच्छतागृहांसाठी शुल्क आकारले जाणार आहे. शुल्क किती आकारायचे, याचा निर्णय महपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, शहराच्या प्रवेशद्वाराजवळ महापालिका अद्ययावत स्वच्छतागृहे बांधणार आहे. ही स्वच्छतागृहे वातानुकूलित असणार आहेत. यातील एका स्वच्छतागृहाचे काम सुरू झाले असून, स्वच्छतागृहासाठी प्रत्येकी ८७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.