गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निर्धार पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या बैठकीत करण्यात आला. मात्र, याच बैठकीत माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे समर्थक व माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांच्या समर्थक गटाने बहिष्कार घातल्याचे चित्र दिसून आले.
खासदार गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे यांची पिंपरी शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिलीच बैठक खराळवाडीत पार पडली. या वेळी अमर साबळे, अॅड. सचिन पटवर्धन, माउली थोरात, महेश कुलकर्णी, राजू दुर्गे, उमा खापरे, वीना सोनवलकर, डॉ. प्रतिभा लोखंडे, अशोक सोनवणे, अमृत पऱ्हाड आदी उपस्थित होते. तथापि, पवार गटातील कोणीही बैठकीच्या ठिकाणी फिरकला नाही.
जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत पदवीधर मतदार नोंदणी, बूथरचना, मोदींच्या जीवनावरील चित्रफीत आदी विषयांवर चर्चा झाली. मोदी यांना पंतप्रधान करण्याचा व त्यासाठी मतभेद विसरून सर्वानी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आपण कुठे कमी पडू नये, नव्या-जुन्यांना बरोबर घेऊन काम करावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. शहराध्यक्ष खाडे यांनी सर्वाना बरोबर घेऊन काम करणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी साबळे, डॉ. लोखंडे, पटवर्धन, खापरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन माउली थोरात यांनी केले. मोरेश्वर शेडगे यांनी आभार मानले.
संघटनमंत्र्याला होती ‘प्रवेशबंदी’
संघनटमंत्री श्रीकांत भारतीय या बैठकीस उपस्थित होते. एकनाथ पवार यांचे मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मुंडे समर्थक व भारतीय यांच्यातील संघर्ष पक्षकार्यकर्त्यांनी मध्यंतरी अनुभवला आहे. भगवान मनसुख शहराध्यक्ष असताना भारतीय यांना शहर भाजपमध्ये अघोषित ‘प्रवेशबंदी’ होती. खाडे यांच्या काळातील पहिल्या बैठकीस ते हजर राहिल्याने ही बंदी उठल्याचे दिसून येते.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2013 रोजी प्रकाशित
मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्धार अन् गडकरी गटाचा बहिष्कार
या बैठकीत पदवीधर मतदार नोंदणी, बूथरचना, मोदींच्या जीवनावरील चित्रफीत आदी विषयांवर चर्चा झाली. मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मतभेद विसरून सर्वानी एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला.

First published on: 30-09-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First meeting of pimpri bjp after selection of city president