‘टाटा पॉवर’च्या पुढाकारातून महिलांची भरारी

पुणे : घरची शेती कसणे, गुरे सांभाळणे, गायी, म्हशींचे दूध काढून विकणे हेच आमचे विश्व होते. मावळ  डेअरीच्या निमित्ताने ‘टाटा पॉवर’ने आम्हाला एकत्र आणले, आम्हाला संवाद, तंत्रज्ञान, व्यवस्थापन शिकवले. आमच्याच गावातील शेतकऱ्यांना या दूध संघात दूध देण्यासाठी तयार करणे अवघड होते. त्यांना समजावणे ही आमची परीक्षा होती. मात्र चिकाटी न सोडता आम्ही सातत्य राखले आणि यशस्वी झालो, अशी भावना मावळ महिला दूध संघाच्या संचालक मंडळावर कार्यरत महिलांनी सोमवारी व्यक्त केली.

‘टाटा पॉवर’तर्फे वडगाव मावळ तालुक्यातील टाकवे या गावी ‘मावळ डेअरी फार्मर सव्‍‌र्हिसेस प्रोडय़ुसर कंपनी लिमिटेड’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यातून उभ्या राहिलेल्या महिला दूध संघाचे औपचारिक उद्घाटन सोमवारी खासदार श्रीरंग बारणे आणि टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

मावळ परिसरातील सव्वीस गावातील बाराशे महिला या दूधसंघाच्या सदस्य असून त्या रोज तब्बल दहा हजार लिटर दुधाचे संकलन करत आहेत. उत्तम फॅट असलेल्या म्हशीच्या   दुधाला बहात्तर रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने महिलांची आर्थिक प्रगती होत आहे.

टाटा पॉवरचे प्रवीर सिंह म्हणाले,की महिला दूध संघाच्या सर्व महिला सदस्यांचे त्यांच्या स्वतच्या नावाचे बँक खाते आहे, त्यात दुधाचे पैसे जमा केले जातात. त्यामुळे महिला सक्षम होत आहेत. दुधाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी तज्ज्ञ पशुचिकित्सकांचे मार्गदर्शन सत्र वेळोवेळी आयोजित केले जाते. तसेच उच्च प्रतीचे पशुखाद्य पुरवले जाते. महिलांची मालकी असल्याने चांगल्या प्रतीचे दूध संकलित करून त्याची योग्य किंमत मिळवण्याबाबत त्या आग्रही आहेत. दुधाबरोबर श्रीखंड, दही, योगर्ट, तूप, लस्सी सारखी उत्पादने तयार करून महिलांना आर्थिक सक्षम करण्याला प्राधान्य असेल. ‘क्रेयो’ या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवरून पुणे शहरात दूध विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आम्हाला आत्मविश्वास मिळाला..

ग्रामीण भागात राहिल्यामुळे बाहेरचे जग आम्ही कधी पाहिले नव्हते. टाटा पॉवरने महिला दूध संघात आम्हाला मालकी दिली. त्यामुळे आम्ही अर्थार्जन तर करू लागलोच, मात्र आम्हीही घराबाहेर पडून स्वतचे जग निर्माण करू शकतो, हा दुर्दम्य आत्मविश्वास दूध संघ स्थापनेच्या प्रवासात आम्ही मिळवला, असे दूध संघाच्या सदस्य महिलांनी आवर्जून नमूद केले.