पुणे :शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचा तत्कालीन संचालक अश्विनीकुमार शिवकुमार याला  पाच कोटी रुपये मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.  जी. ए. टेक्नॉलॉजीसचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी  गैरव्यवहार प्रकरणात गुंतलेल्या दलालांना अश्विनीकुमारला पाच कोटी ३७ लाख रुपये देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे. संतोष हरकळ  आणि अंकुश हरकळ  यांना अटक करण्यात आली होती. हरकळ यांनी दलालांकडून पैसे जमा केले.

डॉ. देशमुख आणि सावरीकर यांनी दलालांना  पाच कोटी ३७ लाख रुपये अश्विनीकुमार यांना देण्यास सांगितले होते.  अश्विनीकुमार यांनी दोन कोटी रुपये जी. ए. टेक्नोलॉजीसचा संस्थापक गणेशन यांना, ३० लाख रुपये  राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना आणि परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांना २० लाख रुपये दिल्याचे निष्पन्न झाले आहे.