पुणे : शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला अरुण गवळी टोळीच्या नावे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पोलिसांनी गजाआड केले. लष्कर पोलीस ठाणे, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने विमाननगर भागातील एका हाॅटेलमध्ये ही कारवाई केली.
रोहन गवारे (वय ३०, रा. शीतल अपार्टमेंट, कवडेवाडी, कोरेगाव पार्क), सुदर्शन गायके (वय २७, रा. महादेव मदिरासमोर, वाळुंज, संभाजीनगर) महेंद्र शेळके (वय ४२, रा. शाहुनाथनगर, जि. बीड) आणि कृष्णा बुधनर (वय २६, हनुमान मंदिराजवळ, खामगाव, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका बांधकाम व्यावसाायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गेेल्या बारा वर्षांपासून बांधकाम व्यवसायात आहेत. बांधकाम व्यावसायिकाचा एक व्यावसायिक भागीदार होता. त्याचा आणि बांधकाम व्यावसायिकात हाॅटेल व्यवसायावरून वाद सुरू आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदाराने व्यवसायासाठी आठ कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता. ही रक्कम बांधकाम व्यावसायिकाने वैयक्तिक कामांसाठी वापरल्याचा आरोप त्याने केला होता. या वादांतून भागीदाराने आरोपींशी संगनमत केले. बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा कट रचला. बांधकाम व्यवासयिकाचा मोबाइल क्रमांक आरोपींनी मिळविला. एका अनोळखी क्रमांकावरून आरोपीने बांधकाम व्यावसायिकाशी संपर्क साधला. गुंड अरुण गवळीचा स्वीय सहायक बोलत असल्याची बतावणी आरोपींनी केली.
आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाला सात कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर तडजोडीत पाच कोटी रुपयांची खंडणी दे, अशी धमकी दिली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाला धमकावून विमाननगर भागातील एका हाॅटेलमध्ये खंडणीची रक्कम घेऊन बोलाविले. हाॅटेलच्या परिसरात सापळा लावून आरोपींना पकडले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, संगीता अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, खंडणी विरोधी पक्षाचे पोलिस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे आणि पथकाने ही कामगिरी केली.