पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर वाढल्याचे पोलिसांच्या कारवायांवरुन दिसत आहे. पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यातून पाच जणांना पिस्तुलासह अटक केली आहे.पुणे मुंबई महामार्गावर एका तरुणाला पिस्तुलासह पकडण्यात आले. ही कारवाई घोरावडेश्वर मंदिराच्या पायथ्याजवळ करण्यात आली. सोहम सागर शिंदे (२१, जांभुळगाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रकाश जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहमच्या ताब्यात ७१ हजर रुपये किमतीची दोन देशी बनावटीची गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे विनापरवाना आढळून आली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

देहूरोमध्ये बेकायदा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी देहूरोडमध्ये एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अरुण धर्मदेव शर्मा (२१, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण हा पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. त्याच्या ताब्यात ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि एक राऊंड जप्त करण्यात आले आहे. देहुरोड पोलीस तपास करित आहेत.

दापोडीमध्ये पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

एका तरुणाने पिस्तुल बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने १८ ऑगस्ट रोजी दुपारी दापोडी-सांगवी संगम क्रॉस रोडवरील श्री सूर्यमुखी महादेव मंदिराच्या रोडवर केली.

राहुल संजय सरोदे (२३, जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई विजय दौंडकर यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याच्या ताब्यात ५ ० हजर रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल बेकायदेशीररित्या आढळले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.

म्हाळुंगेत एकाला अटक

एका व्यक्तीने देशी बनावटीचे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी दुपारी म्हाळुंगे एमआयडीसी येथील येलवाडी गाव हद्दीत करण्यात आली.

या प्रकरणात जितेंद्र राम धुमाळ (४०) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र धुमाळ याच्या ताब्यात ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल विनापरवाना व बेकायदेशीररित्या आढळले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एकास अटक

सार्वजनिक ठिकाणी गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे करण्यात आली.

या प्रकरणात प्रतिक शंकर रसाळ (२१, देहूरोड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई दिपक पिसे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक रसाळ हा ट्रान्सपोर्टनगर येथे शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन प्रतिक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार ५०० रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

काळेवाडीत कोयत्याच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी

एका व्यक्तीला दोघांनी हाताने मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १८ ऑगस्ट रोजी रात्री काळेवाडी येथील तापकीर चौक येथे घडली.

याप्रकरणी शरबेज सरदार हुसैन (४१, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित दत्ता भोरे (३०, रहाटणी) आणि किरण ईश्वर मिरगे (३०, काळेवाडी) यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्यानंतर दोघांनीही हातात कोयता घेऊन “तुला आत्ताच्या आत्ता खल्लास करून टाकतो” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.