दुकानाच्या पाटीला झेंडूच्या फुलांचा हार हा लक्ष्मीपूजनाचा अविभाज्य भाग. गेंदेदार झेंडूचे हार पाटीची शोभा वाढवतात. फुलांच्या सजावटकारांनी हारांच्या प्रकारात आता अनेक बदल केले असून हार आणि तोरणे अधिकाधिक आकर्षक केली आहेत. त्यामुळेच दुकानांमधील लक्ष्मीपूजन आता पाटीच्या हारापुरते मर्यादित न राहता ते फ्लॉवर डेकोरेशनपर्यंत गेले आहे. हजारो रुपये खर्च करून दुकानासाठी फ्लॉवर डेकोरेशन करून घेण्याकडे यंदाही व्यापारीवर्गाचा कल राहिला.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दुकानाची साफसफाई आणि नंतर दुकानाची सजावट करण्याचे काम व्यापारी आणि त्यांच्या दुकानांमधील कर्मचारी आदल्या रात्रीच सुरू करतात. प्रत्यक्ष लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाटीला हार घातला जातो आणि नंतर लक्ष्मीपूजनाचा सोहळा सुरू होतो. दुकानाच्या पाटीला झेंडूच्या फुलांचा हार किंवा झेंडू आणि शेवंतीचे भरगच्च तोरण लावण्याची  पद्धत होती. त्यात आता बदल झाला असून पाटीला हार किंवा तोरण लावण्याबरोबरच दुकानाची दर्शनी बाजू आणि आतील भागाची सजावट फुलांनी करून घेण्याकडे व्यापारीवर्गाचा कल आहे. पुण्यात बुधवारी रात्रीपासूनच फुलांच्या या देखण्या सजावटीला सुरुवात झाली आणि गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापर्यंत व्यापारी भागांमध्ये दुकानांच्या सजावटीची कामे सुरू होती.
लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त ज्या व्यापाऱ्यांकडे सकाळी होते त्यांच्या दुकानांमध्ये बुधवारी रात्रीच कारागिर पाठवले होते आणि गुरुवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत ज्यांचे मुहूर्त होते त्या त्या वेळेआधी कारागीर पाठवून सजावटीचे काम पूर्ण केले, अशी माहिती सरपाले फ्लॉवर र्मचटचे सुभाष सरपाले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. सरपाले यांचे सत्तर ते ऐंशी सहकारी हे काम करत होते. यंदा पुणे जिल्हा आणि परिसरातून आलेला झेंडू, तसेच बंगळुरू येथून आलेली शेवंती आणि बंगळुरू तसेच परदेशातून आलेली कटफ्लॉवर्स मुख्यत: दुकानांच्या सजावटीसाठी वापरण्यात आली. सजावटीचे काम घेताना दुकानाच्या पाटीची तसेच प्रवेशद्वाराची लांबी-रुंदी, उंची यांचा अभ्यास करावा लागतो. तसेच आतील भागाची सजावट करताना ती देखणी होईल; पण दुकानातील मालही झाकला जाणार नाही याची काळजी घेत सजावट करावी लागते.
दिवाळीच्या निमित्ताने मंदिरांमध्येही भव्य सजावट करण्याचे प्रमाण पुण्यात वाढत आहे. त्यात आकाशकंदील, तोरणे, रांगोळ्यांचे गालिचे, रोषणाई यांचा वापर केला जातो. अनेक मंदिरांमध्येही आता फुलांच्या सजावटीचे काम व्यावसायिक कलाकारांना दिले जाते. या सजावटीबरोबरच अनेक मंदिरांमध्ये दीपोत्सवही आयोजित करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुकानाच्या पाटीसाठी लागणारे झेंडू आणि शेवंतीचे हार यंदा दीड हजार ते पाच- सात हजार रुपयांपर्यंत विकले गेले.
झेंडू आणि शेवतीची तोरणे बारा ते वीस हजारांपर्यंत होती.
दुकानांच्या सजावटीसाठीही आकारमानाप्रमाणे पंधरा हजारापासून दर आकारले गेले.

 
फुलांनी मनाला प्रसन्नता मिळते आणि सणाचा, उत्सवाचा आनंद वाढतो. फक्त फुलांची मांडणी आकर्षक पद्धतीने आणि फुलांची रंगसंगती विचारात घेऊन करावी लागते. त्या बरोबरच जेथे सजावट करायची आहे तेथील जागेचाही विचार करावा लागतो. पुणे, बंगळुरू तसेच परदेशातून आलेली फुले यंदा सजावटीसाठी वापरली.
सुभाष सरपाले
सरपाले फ्लॉवर र्मचट

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flower decoration for diwali
First published on: 24-10-2014 at 03:25 IST