शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ते पाटील इस्टेट दरम्यान बांधल्या जात असलेल्या संचेती चौकातील उड्डाणपुलाचे उर्वरित काम टी अॅन्ड टी प्रा. लि. या कंपनीला देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. स्थायी समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे या पुलाचे रखडलेले काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संचेती चौकात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या चौकात उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानुसार हे काम तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. या कामासाठी ५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित होता. प्रत्यक्षात या पुलाच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्यानंतर ती ३६ टक्के जादा दराने आली. या निविदेला तेव्हा मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुलाच्या कामाबाबत काही आक्षेप घेतल्यानंतर आराखडय़ात बदल करण्यात आले. त्यामुळे पुलाच्या कामासाठी २१ कोटी रुपये एवढा जादा खर्च येणार आहे.
या कामासाठी दोनदा निविदा काढण्यात आली होती. टी अॅन्ड टी कंपनीची १४ टक्के जादा दराची निविदा आली होती. पुलाची आवश्यकता लक्षात घेऊनया फेरनिविदेचा स्थायी समितीने विचार करावा व निविदा मंजूर करून काम मार्गी लावावे अशी मागणी करण्यात येत होती. निविदा मान्य करण्याचा हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आल्यानंतर त्यावर चर्चा होऊन प्रशासनाने ठेवलेले विषयपत्र मंजूर करण्यात आले.