पिंपरी : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मोशी येथे अन्न, औषधतपासणी प्रयोगशाळा उभारणीचे काम हाती घेतले आहे. प्रयोगशाळेचे काम वेगाने सुरू असून, ते आठ महिन्यांत पूर्ण होईल. नवीन प्रयोगशाळेमुळे मोशी कार्यालयातच भेसळीचा अहवाल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कारवाईमध्ये लागणारा विलंब कमी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न भेसळ, तसेच बनावट औषधे विक्रीबाबत देखरेखीचे काम बघितले जाते. दैनंदिन, तसेच सणासुदीच्या काळात या विभागाचे पथक विशेष तपासणी मोहीम राबवते. अन्नपदार्थांचे नमुने गोळा केल्यानंतर तपासणीसाठी ते खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. मात्र, त्याचा अहवाल मिळण्यास काही महिने प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी, कारवाई करण्यास मर्यादा येत होत्या. मोशी येथील कार्यालयात अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहेत. त्यात प्रशिक्षण केंद्र, स्वतंत्र गोदाम उभारले जाणार आहे. या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आठ महिन्यांत या ठिकाणी प्रयोगशाळा पूर्ण होईल. या नव्या सुविधांमुळे अन्नपदार्थ, औषधे, सौंदर्य साधने, कच्च्या मालाची जलद व अचूक तपासणी होईल. यामुळे विभागाच्या अंमलबाजवणी प्रक्रियेच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्न तपासणीसाठी ३८ उपकरणे

मोशी येथील कार्यालयात प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू झाले आहे. या कार्यालयात सध्या फर्निचर, नवे विभाग उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. अन्न तपासणीसाठी ३८, औषध तपासणीसाठी ३५ उपकरणे येथे असणार आहेत. यापूर्वी मनुष्यबळ, अतिरिक्त कामाचा ताण यामुळे कामावर काही मर्यादा येत होत्या. मात्र, आता अन्न निरीक्षकदेखील रुजू झाले आहेत.

मोशी येथे नवीन प्रयोगशाळेचे काम आठ महिन्यांत पूर्ण होईल. यामुळे भेसळ तपासणी अहवाल त्वरित उपलब्ध होतील. कारवाईला वेग येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी सांगितले.