पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) वनाझ, आनंद नगर, आयडियल कॉलनी, नळ स्टॉप आणि गरवारे कॉलेज या पाच मेट्रो स्थानकांच्या परिसरातील पदपथांची चार किलोमीटर अंतरापर्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मेट्रोचे प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी ही बाब त्रासदायक होत असल्याचे ‘पादचारी अनुकूलता मूल्यांकन अहवाला’तून निदर्शनास आले आहे.महामेट्रोने ‘पुणे नॉलेज क्लस्टर’, ‘पर्यावरण अन् शाश्वत विकास शिक्षण संस्था’ आणि ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’ या तीन संस्थांबरोबर ‘चालत, बस-सायकल अन् मेट्रो’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत या संस्थानी मेट्रो स्थानक परिसरातील पदपथांचा अभ्यास करून ‘पादचारी अनुकूलता मूल्यांकन अहवाल’ तयार केला आहे.

महामेट्रोच्या रामवाडी ते वनाज या मार्गिकेवरील वनाझ, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळ स्टॉप आणि गरवारे कॉलेज या पाच मेट्रो स्थानकांभोवती अभ्यास करण्यात आला. यामध्ये अनेक ठिकाणी प्रामुख्याने पदपथांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण, झाडांच्या मुळांमुळे तुटलेले पदपथ, पदपथांवर कचऱ्याचा ढीग पडल्याचे आढळून आले. त्यामुळे मेट्रो प्रवाशांसह नागरिकांना चालणेही कठीण होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.कोथरूड येथील शिक्षक नगरमधील योगानंद पार्क गृहनिर्माण संस्था ते रामचंद्र माने हा रस्ता वनाज मेट्रो स्थानकाला जोडण्यात आला आहे. या रस्त्यालगत शाळा, बस थांबे, दुकाने, निवासी सोसायट्यांचे जोडमार्ग आहेत. या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण, पदपथाच्या तुटलेल्या फरश्या, पदपथावर झाकणे नसलेले चेंबर यांचा अडथळा होत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वाधिक वर्दळ असलेले रस्ते

नानासाहेब धर्माधिकारी रस्ता, नानासाहेब सुतार रस्ता, स्वामी विवेकानंद रस्ता आणि श्रीपती सुथार या चार रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ, पदपथांचा अभाव, खड्डे यामुळे स्थानकापर्यंत पोहचणे प्रवाशांना कठीण होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महामेट्रोच्या ‘चालत, बस-सायकल अन् मेट्रो’ या मोहिमेंतर्गत ‘पादचारी अनुकूलता मूल्यांकन’ अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक आणि मेट्रो प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तीन हजारांहून अधिक नागरिकांनी महापालिकेला पादचारी रस्ते आणि सुविधांची अंमलबजावणी करण्याबाबतचे पत्र दिले आहे.अंकिता काणे,वरिष्ठ सल्लागार, पुणे नॉलेज क्लस्टर