‘‘देशात विविध ज्ञानशाखांबद्दल संशोधन आणि लेखन फारसे होत नाही. सध्या घडणाऱ्या काही घटना पाहता समाज ज्ञानाधिष्ठित नसल्याचे दिसून येते. विज्ञानविषयक जाणिवा समाजात रुजविण्यासाठी विज्ञानविषयक लेखन वाढविणे व ते घरोघरी पोहोचविणे हाच उपाय आहे,’’ असे मत ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
मराठीतून विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या लेखकांसाठी ‘महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना शुक्रवारी कोत्तापल्ले बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय बापट, डॉ. दिलीप रानडे, विद्याधर बोरकर या वेळी उपस्थित होते.
कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘देशांत मराठी भाषक संख्येने दहाव्या क्रमांकावर आहेत. मात्र मराठी भाषकांच्या लेखन व वाचनाची परिस्थिती उत्साहवर्धक नाही. देशात विविध ज्ञानशाखांबाबत संशोधन व लेखन फारसे होत नाही. नव्या जाणिवा तयार करण्यापेक्षा परदेशात झालेले संशोधन गिरवण्यावरच अधिक भर दिला जातो. सध्या रोज एखादा नवा बाबा किंवा बुवा उदयाला येतो आणि उच्चविद्याविभूषित समाज त्यांच्या पाठीशी उभा राहताना दिसतो. आजच्या काळातही गावांमधून चिकुनगुनियासारखा आजार घालविण्यासाठी मरीआईचा गाडा गावाबाहेर सोडला जातो. ही परिस्थिती पाहता समाज ज्ञानाधिष्ठित नसल्याचेच दिसून येते. विज्ञानविषयक जाणिवा वाढविण्यासाठी विज्ञानविषयक लेखन वाढविणे व ते घरोघरी पोहोचविणे आवश्यक आहे.’’