पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेतल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करावी लागणार आहे. त्यासाठी ‘गुगल अर्थ’ आणि ‘गुगल मॅप’चा वापर करून प्रभाग रचना केली जाणार असल्याचे महापालिकेचे निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले. ८४ हजार ते जास्तीत जास्त ९२ हजार मतदारसंख्या असलेला एक प्रभाग होण्याची शक्यता आहे.
पुण्यात २०११ वर्षाची लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचना केली जाणार आहे. शहरातील ६ हजार ४०० प्रगणक गट आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील प्रगणक गटाचा विचार त्यासाठी करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रगणक एकत्र करून चार सदस्यांसाठी सुमारे ८४ हजार आणि जास्तीत जास्त ९२ हजार मतदार संख्या असलेला एक प्रभाग होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार पुणे पालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे येणारी महापालिका निवडणूक होणार आहे. ४२ प्रभाग होणार असल्याचा अंदाज आहे. पालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेली उरुळी आणि फुरसुंगी ही दोन गावे राज्य सरकारने वगळल्याने प्रभाग रचनेत बदल करावा लागणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या १६६ ऐवजी एक कमी होऊन १६५ होण्याची शक्यता पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
प्रभाग रचना करताना नाले, ओढे, नैसर्गिक प्रवाह, मोठ्या रस्त्यांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत माहिती – तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभाग रचना करताना पारदर्शकता राखली जाईल, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
२० जणांची समिती
राज्य सरकारने प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या कामासाठी २० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी पालिकेच्या सावरकर भवन येथे मुख्य कार्यालय असणार आहे.
आठ नगरसेवक कमी
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने २०२२ मध्ये महापालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये समाविष्ट ३४ गावांचा समावेश होता. त्यावेळी राज्य सरकारने ३१ लाख लोकसंख्येसाठी १६८ सदस्य संख्या तर त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक सदस्य असे धोरण निश्चित केले होते. त्यामुळे पुणे महापालिकेची सदस्य संख्या १७३ होणार होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुती सरकार सत्तेत आल्यावर त्यामध्ये फेरबदल करत चार सदस्यीय प्रभाग रचना केली. मात्र, ३१ लाख लोकसंख्येसाठी १६१ सदस्य संख्या व पुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक सदस्य असे निश्चित केले. त्यामुळे सदस्य संख्या १६५ झाली, अशी माहिती प्रसाद काटकर यांनी दिली.
पुणे पालिकेची आगामी निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे आदेश राज्य सरकारकडून आले आहेत. याचा अभ्यास करून पालिका पुढील नियोजन करण्यासाठी सज्ज आहे. आयुक्तांच्या आदेशाने शहराची माहिती असलेल्या २० कर्मचाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. – प्रसाद काटकर, निवडणूक अधिकारी, पुणे महापालिका