पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये पहिल्यांदाच ‘लेपर्ड कॅट’ या दुर्मीळ मांजराच्या प्रजननाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आईपासून विलग करून संगोपन करण्यात आलेले हे पिल्लू आता सात महिन्यांचे झाले आहे. राज्यातील प्राणिसंग्रहालयांमधील हा पहिला यशस्वी प्रयोग असून लेपर्ड कॅट संवर्धनाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

बिबट मांजर किंवा वाघाटी मांजर म्हटले जाणारे चार लेपर्ड कॅट सध्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये आहेत. संग्रहालय प्रशासनाने वर्षभरापूर्वी या मांजराच्या प्रजननाचा प्रयोग करण्याचे ठरवले. त्यातील एका जोडीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका पिल्लाला जन्म दिला. या पिल्लाचे वजन अवघे ७६ ग्रॅम असल्याने त्याची विशेष काळजी घ्यावी लागली. आईपासून विलग करून त्याचे संगोपन करावे लागले. या पिलासाठी राखीव जागा ठेवून पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सभोवातलचे तापमान, त्याचा आहाराची विशेष काळजी घेतली. पिल्लाची तब्येत हळूहळू सुधारली असून आता ते सात महिन्यांचे झाले आहे, अशी माहिती राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेपर्ड कॅट ही दुर्मीळ आणि लाजाळू असल्याने जंगलात फिरताना ती पटकन दिसत नाही. राज्यात सध्या केवळ राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये या चार मांजरी आहेत. इतर ठिकाणी झालेल्या प्रयोगांना यश आले नाही. मात्र, आमच्याकडे ऑक्टोबरमध्ये पिल्लू जन्मले. पिल्ल्यासाठी पहिले सहा महिने महत्त्वाचे असतात, त्यामुळे ही माहिती जाहीर केली नव्हती. आता सुदृढ झालेल्या पिल्लाला पिंजऱ्यात सोडले आहे. अजूनही आम्ही त्याची विशेष काळजी घेत आहोत. प्राणिसंग्रहालयाला भेट देणाऱ्या नागरिकांना दिसेल अशा पिंजऱ्यात लवकरच त्याला सोडण्यात येईल.- डाॅ. घनश्याम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी