राज्यातील तापमानात चढ-उताराचा अंदाज

कमी दाबाचे पट्टे आणि ढगाळ स्थितीमुळे राज्यात अद्यापही कडाक्याची थंडी अवतरलेली नाही.

(संग्रहित छायाचित्र)
= राज्यातील कोरडे हवामान आणि उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे येत असल्याने प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन हलका गारवा निर्माण झाला आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात काही भागांत किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे. पुढील आठवडाभर तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कमी दाबाचे पट्टे आणि ढगाळ स्थितीमुळे राज्यात अद्यापही कडाक्याची थंडी अवतरलेली नाही. सध्या राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. त्याच बरोबरीने उत्तरेकडील काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी असल्याने तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील किमान तापमानात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ७ ते ८ अंशांनी अधिक असणारे किमान तापमान आता काही भागात सरासरीच्या आसपास आले आहे. त्यामुळे हलका गारवा आहे. कोकण विभागातही तशीच स्थिती आहे. मराठवाडय़ातील नांदेड वगळता इतरत्र किमान तापमान सरासरीच्या २ ते ३ अंशांनी अधिक आहे. विदर्भातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी अधिक आहे. गुरुवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

पावसाची शक्यता

पश्चिमी चक्रवातामुळे पंजाब, हरियाणा, चंडीगड आणि दिल्ली या भागांत २२ ते २४ जानेवारी दरम्यान पावसाचा अंदाज आहे. २३ जानेवारीच्या आसपास जम्मू, काश्मीर आणि हिमालयाच्या काही भागांत हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात राज्यातील तापमानात चढ-उतार होणार आहे. दोन दिवसांत काही प्रमाणात तापमानवाढ होऊन पुन्हा ते कमी होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Forecast of temperature fluctuations in the state abn